मोठी बातमी: राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू होणार ‘ही’ योजना!

बीड: राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारकडून लवकरच नवीन आरोग्य योजना आणली जाणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावे ही योजना राज्यात लागू केली जाणार असून, याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाणार आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना त्यांनी प्रस्तावित असलेल्या आरोग्य योजनेची घोषणा केली.

वयाचे 60 वर्ष ओलांडल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना अनेक आजार बळवतात. या आजारांचं निदान करण्यासाठी तपासण्या कराव्या लागतात. या चाचण्या खर्चिक असतात. त्यासाठी हजारो रुपयांचा खर्च येतो. अनेकांना आर्थिक परिस्थितीमुळे रुग्णालयात जाणंही शक्य होत नाही. या सगळ्या बाबींचा विचार करून राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी शरद पवार यांच्या नावे आरोग्य योजना आणण्याचं प्रस्तावित आहे, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.

राज्यातील वयोवृद्ध नागरिकांसाठी शरद शतम: योजना आहे. या योजनेअंतर्गत 65 वर्षावरील सर्व वयोवृद्धांच्या आरोग्य चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत. वर्षातून एकदा या सर्व चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत. या चाचण्यांमुळे आजाराचे निदान वेळेवर होऊन उपचार करता येतील. या योजनेचा राज्यातील हजारो वृद्धांना फायदा होणार आहे. येत्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेला मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

आरोग्य विमा कवच योजना

जेष्ठ नागरिकांवर आधुनिक राहणीमानाचा ताण पडत आहे. त्याचबरोबर त्यांच्या आरोग्य व इतर गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक परिस्थितीचाही त्यांना सामना करावा लागत आहे. वेळोवेळी आरोग्य तपासण्या न करता आल्यामुळे विविध आजार शेवटच्या टप्प्यात लक्षात येतात. त्यामुळे उपचारास विलंब होतो व रुग्ण दगावण्याचा धोका असतो. या सर्व बाबींचा विचार करुन, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विमा कवच योजना सुरु करण्याचा निर्णय याअगोदर घेण्यात आला आहे. त्यासाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.