महिन्याच्या सुरुवातील गँस सिलेंडर दरात ‘इतक्या’ रुपयाने झाली वाढ! जाणून घ्या

मुंबई: ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी सामान्यांना मोठा झटका दिला आहे. कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या सिलिंडरची किंमत तब्बल 43.5 रुपयांनी वाढवली आहे. यामुळे रेस्टॉरंट्स, ढाबे इत्यादी ठिकाणचे पदार्थ आणखी महाग होऊ शकतात.

इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, आता मुंबईत 19 किलोच्या व्यावसायिक वापराच्या सिलिंडरची किंमत ही 1693 रुपये एवढी झाली आहे. पूर्वी याची किंमत 1650 रुपये होती. दरम्यान, घरगुती वापराच्या 14.2 किलोच्या सिलेंडर किंमतीत काहीही बदल झाल्याने सामन्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे राजधानी दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक वापराच्या सिलेंडरची किंमत 1736.5 रुपये झाली आहे. पूर्वी ती 1693 रुपये होती.

कोलकातामध्ये 19 किलोच्या व्यावसायिक वापराच्या सिलिंडरची किंमत सर्वाधिक 1805.5 रुपये झाली आहे. पूर्वी याची किंमत ही 1770.5 रुपये होती. हे लक्षात घेण्यासारखे आहे की पेट्रोलियम कंपन्या दर 15 दिवसांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीचा आढावा घेतात आणि त्यानुसार त्यामध्ये बदल करतात.

घरगुती वापरच्या LPG गॅसबाबत दिलासा

यापूर्वी 1 सप्टेंबर रोजी एलपीजी सिलिंडरच्या किंमती, म्हणजे घरगुती एलपीजीमध्ये 25 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. या वाढीनंतर मुंबईत 14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 885 रुपये एवढी झाली. तर दिल्लीत घरगुती वापराच्या सिलेंडरसाठी सध्या 884.50 रुपये मोजावे लागत आहेत. मात्र, या महिन्याच्या सुरुवातीला तरी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे सामान्य जनतेसाठी ही थोडी फार दिलासा देणारी बाब आहे.