जन्मदात्या पित्यानेच 5 वर्षांच्या मुलाला पंचगंगा नदीत फेकलं!

अहमदनगर: औषधोपचाराचा खर्च परवडत नसल्याच्या कारणावरून पाच वर्षाच्या मुलाच्या आजाराच्या खर्चाला कंटाळून जन्मदात्या बापाने त्याला नदीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सदरील घटना जिल्ह्यातील इचलकरंजी शहरातील कबनूर गावात घडली आहे. अफांन सिकंदर मुल्ला ( वय 5 रा. पंचगंगा साखर कारखाना रोड कबनूर) असे संबंधित मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पिता सिकंदर हुसेन मुल्ला (वय 48) याला शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिकंदर हा गेल्या काही वर्षांपासून कबनूर येथे राहतो. त्याला पाच वर्षाचा मुलगा आहे. लहानपणापासूनच मुलाला आजाराने वेढल्याने कुटुंबीय सततच्या खर्चाने त्रस्त झाले होते. या खर्चाला कंटाळून सिकंदरने दोन महिन्यांपूर्वी घर सोडून पलायन केले होते. दरम्यान सिकंदरची पत्नी आणि मेव्हण्याने त्याचा शोध घेतला होता. त्यावेळी मुलाला सोडून न जाण्याचा दम त्याला देण्यात आला होता. मुलाच्या आजारामुळे मुंबईला होणाऱ्या वारंवार फेर्‍या आणि खर्च यामुळे कंटाळलेल्या सिकंदरने गुरुवारी रात्री सायकलवरुन पंचगंगा नदी गाठली. त्यानंतर मोठ्या पुलावरुन पाच वर्षांच्या मुलाला थेट फेकून दिले.

दरम्यान सिकंदर रात्री घरी आल्यानंतर त्याने मुलाला पंचगंगा नदीत फेकल्याचे नातेवाईकांना सांगितले. परंतु त्याच्या बोलण्यावर नातेवाईकांनी विश्वास ठेवला नाही. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही अफान सापडत नसल्याने नातेवाईक व नागरिकांनी त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी कसून चौकशी करता त्याने अफानला पंचगंगा नदीवरील मोठ्या पुलावरून फेकून दिल्याचे सांगितले. त्यामुळे रात्री उशिरा पोलिसांनी अफान याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु अंधारामुळे शोध थांबवून शुक्रवारी सकाळपासून पुन्हा त्याचा शोध सुरू केला आहे.