राज्यात पुढील ३ दिवसात ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता!

औरंगाबाद: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. मराठवाड्यात तर दोन दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर काल रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने पिके पाण्याखाली गेली आहे. त्यातच आता पुढील तीन दिवस राज्यातील काही भागांत जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आधीच शेतपिके पाण्याखाली गेली आणि आता पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने बळीराजाची मात्र चिंता वाढली आहे.

कोकण आणि मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी जोरदार, तर बहुतांश भागात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, परभणी व उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता, मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान सल्ला पत्रकात वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने परतीच्या पावसाचा अंदाज देखील व्यक्त केला आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास 06 ऑक्टोबरला सुरु होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

गुलाब चक्रीवादळामुळे 2 दिवसात पावसाने अनेक भागात नद्या ओसंडून वाहत आहेत. शेतीचं नुकसान झालं आहे. अनेकांना जीव गमवावा लागला, जनावर वाहून गेली आहेत. काही ठिकाणी 100 ते 150 मिली पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यातील 10 पैकी 7 जिल्ह्यात सरासरी 170 ते 190 मिली पाऊस झाला आहे. उस्मानाबादमध्ये हेलिकॉप्टर आणि बोटीने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. आतापर्यंत 81 % पंचनामे झाले असून 19% पंचनामे उर्वरित आहेत. 17 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळे पंचनाम्यात अडथळे येत आहेत. पंचनामे झाल्यानंतर 22 लाख हेक्टर जमिनीच नुकसान होण्याची अंदाज आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अतिवृष्टी भागाचा दौरा करणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!