पंजाबचा 5 गडी राखून कोलकातावर दमदार विजय; कर्णधार केएल राहुलची एकाकी झुंज यशस्वी

मुंबई: आयपीएलमध्ये शुक्रवारी झालेल्या ४५व्या मॅचमध्ये पंजाब किंग्सचा विजय झाला. पंजाब किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पाच विकेट राखून पराभव केला. टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या पंजाबने कोलकाताला वीस ओव्हरमध्ये सात बाद १६५ या धावसंख्येवर थोपवले. नंतर पंजाबने १९.३ ओव्हरमध्ये पाच विकेट गमावून १६८ धावा केल्या.
दरम्यान केकेआरच्या १६६ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या पंजाब संघाकडून कर्णधार केएल राहुलने आणि मयांकने उत्तम सुरुवात करुन दिली. पण मयांक ४० धावावंर बाद झाल्यानंतर राहुलने मात्र एकहाती खिंड लढवली. राहुलने ५५ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकार खेचत ६७ धावा केल्या. तसेच मार्करम आणि पूरन यांनी अनुक्रमे १८ आणि १२ धावा केल्या. तर अखेरच्या षटकात राहुल बाद झाल्यानंतर षटकार खेचून सामना जिंकवून देणाऱ्या शाहरुख यानेही नाबाद २२ धावा करत सामना जिंकवून दिला. केकेआरकडून वरुण चक्रवर्तीने २ तर, नारायण, अय्यर आणि मावी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
पॉइंट्स टेबलची स्थिती
पॉइंट्स टेबलमध्ये चेन्नई सुपरकिंग्स (१८ गुण) पहिल्या आणि दिल्ली कॅपिटल्स (१६ गुण) दुसऱ्या स्थानी आहे. या दोन्ही टीम पुढच्या फेरीसाठी पात्र झाल्या आहेत. पुढच्या फेरीच्या आणखी दोन टीम निश्चित व्हायच्या आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (१४ गुण) तिसऱ्या आणि कोलकाता नाईट रायडर्स (१० गुण) चौथ्या स्थानी आहेत. पंजाब किंग्स (१० गुण) ही टीम कोलकाता विरुद्धची मॅच जिंकल्यानंतर पाचव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्स (१० गुण) सहाव्या स्थानी आहे. राजस्थान रॉयल्स ८ गुणांसह सातव्या तर सनरायझर्स हैदराबाद ४ गुणांसह आठव्या स्थानावर आहे. कोलकाता, पंजाब आणि मुंबई यांचे स्थान समान गुणांमुळे धावगतीच्या आधारे निश्चित झाले आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये कोलकाता आणि पंजाब यांच्या प्ले ऑफ राउंडमध्ये प्रत्येकी बारा मॅच खेळून झाल्या आहेत. या दोन्ही टीमना प्ले ऑफ मध्ये आणखी प्रत्येकी दोन मॅच खेळण्याची संधी आहे. इतर सहा टीमच्या प्ले ऑफ राउंडच्या प्रत्येकी ११ मॅच खेळून झाल्या आहेत. त्यांना प्ले ऑफ मध्ये आणखी प्रत्येकी ३ मॅच खेळण्याची संधी आहे.