शरद पवारांनी आमदार निलेश लंके यांच्या आई-वडिलांची घेतली भेट; लंके कुटुंब भारावलं

1

अहमदनगर: पारनेर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्या घरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट दिली आहे. निलेश लंके यांनी कोरोनाच्या काळात फार महत्वाची भुमिका बजवाली आहे. त्यांच्या कोविड सेंटरची चर्चा राज्यातच नव्हे तर संपूर्ण जगभरात झाली आहे. कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक शरद पवारांसह पक्षाच्या सर्वच नेत्यांनी केलं आहे.

महत्वाची बाब म्हणजे आमदार, खासदाराचं घर म्हणजे मोठा बंगला, अलिशान गाड्या, नोकरचाकर असं चित्र असतं. पण आमदार निलेश लंके यांचं घर अत्यंत साधं आहे. एक रुम, त्यातच छोटं किचन आणि बाजूला बाथरुम अशी लंके यांच्या घराची रचना आहे. याच घराच्या लाकडी चौकटीतून पवारांनी लंकेंच्या घरात प्रवेश केला.

यावेळी आपल्या पत्र्याच्या छोट्या घरात पक्षाचे अध्यक्ष आणि देशातील एका बड्या नेत्यानं भेट दिल्यानं लंके कुटुंबीय भारावून गेलं होतं. एका प्लास्टिकच्या खुर्चीवर बसून पवार यांनी निलेश लंके यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. लाकडी कपाटाला टेकून ठेवण्यात आलेल्या खुर्चीवर बसून पवारांनी निलेश लंके यांच्या आई-वडिलांची चौकशी केली. तसंच निलेश लंके यांच्या कार्याबाबत कौतुकही केलं.

तसेच शरद पवार लंके यांच्या घरी दाखल झाल्यानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. पवारांना पाहण्यासाठी लोक आजूबाजूला असणाऱ्या घरांच्या छतावर बसले होते. पवारांच्या गाडीवर पुष्पवृष्टीकरुन त्यांचं स्वागत करण्यात आलं.

कोण आहेत निलेश लंके?

निलेश लंके हे अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर मतदारसंघाचे आमदार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकीटावर ते निवडून आले. पहिल्यांदाच ते आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी तिनवेळा निवडून आलेल्या शिवसेनेच्या विजय औटी यांचा पराभव केला. लंके यांचे वडील हे प्राथमिक शिक्षक होते. 12 वी पर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी आयटीआय केलं आहे. काहीकाळ ते काही कंपन्यांमध्ये काम करत होते. हंगा स्टेशनवर त्यांनी छोटे हॉटेल देखील सुरु केलं. परंतु काही काळाने ते बंद केलं. त्यांनंतर त्यांनी सामाजिक काम करण्यास सुरुवात केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.