धक्कादायक: पप्पा देवाघरून येत नाहीत, म्हणून देवाघरी जायचा; माय-लेकीची गळफास आत्महत्या

नाशिक: आई पप्पा कधि येणार सतत आपल्या आईला लहान मुलगी अनया विचारायची , परंतू आईकडे या प्रश्नाचे उत्तर नसाचे. अखेर आर्थिक विवंचना, प्रचंड निराशेच्या गर्तेत गेलेल्या सुजाता प्रवीण तेजाळे या महिलेनं आपल्या मुलीसह गळफास घेत आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना शनिवारी नाशिकमध्ये उघड झाली.
कोरोनानं अनेक प्रकारे छळलं. त्यानं कोणाला अर्ध्यातनं उठवून नेलं, तर कोणाला मृत्यूला जवळ करायला भाग पाडलं. असंच काहीसं नाशिकमध्ये घडलंय. त्या तिघांचं हसतं-खेळतं कुटुंब. मात्र, कोरोनाची दुसरी लाट आणि ते क्षणार्धात विखुरलं गेलं. सुजाता यांच्या पतीला कोरोना झाला. त्यात त्यांचं आजारपण, कुटुंबाची ओढाताण सुरू झाली. सुजातांनी मुलगी अनयाला सोबत घेऊन मोठ्या धीरानं या परिस्थितीलाही तोंड दिलं. मात्र, इतकं करूनही घरातला कर्ता पुरुष वाचलाच नाही. तेव्हापासून घराचे वासे फिरले, ते फिरलेच. आर्थिक विवंचना सुरू झाली.
सुजाता नैराश्याच्या खोल गर्तेत गेल्या. तर मुलगी अनया त्यांना सतत पप्पा कधी येणार हे विचारायची. त्यांनी मुलीला ना-ना प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला ते समजलं नाही. सुजातांच्या मनानंही ते नीटसं स्वीकारलं नाही. यामुळं त्या मनानं अजून खचल्या. त्यातूनचं त्यांनी चुटपूट लावणारी सुसाईड नोट लिहून ठेवली. देवाघरून पप्पा येत नाहीत, म्हणून देवाघरी जाण्याचा निर्णय घेतला आणि लहानग्या अनयासह या जगाचा निरोप घेतला. काळीज हेलावून टाकणाऱ्या या घटनेनं नाशिककरांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.