मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स करो या मरो, सामना जिंकला तरच प्लेऑफच्या शर्यतीत

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा ५१ वा सामना गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. आज  शारजाहच्या मैदानावर हा सामना खेळला जाईल. उभय संघ या हंगामात दुसऱ्यांदा एकमेकांशी भिडतील. यापूर्वी दिल्ली येथे मुंबई आणि राजस्थान संघ आमने सामने आले होते. हा सामना मुंबईने ७ विकेट्सने जिंकला होता.

सोमवारी दुबईत झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जचा ३ गडी राखून पराभव केला आणि गुणतालिकेत अग्रस्थानी झेप घेतली. या सामन्यामधील दोन्ही संघ आधीच बाद फेरीत म्हणजेच प्लेऑफमध्ये पोहचले असल्याने या सामन्यातील विजय हा गुणतालिकेमध्ये अव्वल ठरणारा संघ निश्चित करण्यासाठी होता.

दोन्ही संघांना आयपीएल २०२१ च्या प्लेऑफच्या शर्यतीत आपले आव्हान टिकवून ठेवण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी हा सामना खेळावा लागणार आहे. त्यांना उर्वरीत दोन सामने जिंकण्यासोबत नेट रन रेट चांगली ठेवण्यासाठी मोठ्या फरकाने विजय मिळवणे आवश्यक आहे. दोन्ही संघांचे गुण सध्या समान असून राजस्थानचा नेट रन रेट -०.३३७ आहे. तर मुंबईचा नेट रन रेट -०.४५३ आहे आणि म्हणूनच हा संघ सध्या गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे.

पण जिंकणाऱ्या संघांसाठी देखील पुढचा मार्ग सोपा नसेल. कारण, कोलकाता नाईट रायडर्स पुढील सामन्यात जिंकल्यास ते १४ गुणांसह मुंबई, पंजाब आणि राजस्थानमधील अंतर वाढवतील आणि प्लेऑफमधील चौथा संघ बनण्याच्या जवळ पोहोचतील. त्यातही त्यांचा रन रेट +०.२९४ असल्याने त्यांच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या शक्यता दुप्पटीने वाढतील. असे झाल्यास मुंबईचे आव्हान अजूनच कठीण बनेल आणि त्यांना दोन्ही सामने २०० धावांच्या फरकाने जिंकावे लागतील. तरच हा गतविजेता संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकेल.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!