राज्यात विजांच्या कडकडाटासह पुढील चार दिवस मुसळधार पाऊस; हवामान खात्याकडून इशारा
मुंबई: राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने सोमवारी दिला. मान्सूनचा पाऊस या आठवड्यात राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू करण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम राज्यात अनेक ठिकाणी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काल पुण्यात जोरदार पाऊस झाला असून आता राज्यातील विविध जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
राज्यात परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. गेल्या काही दिवसात गुलाब चक्रीवादळ आणि शाहीन चक्रीवादळाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पाऊस झाला. मराठवाड्याला या पावसाचा सर्वाधिक फटका बसला. विजांच्या कडकडाटासह, जोरदार झालेल्या पावसाने अनेक पिकांचे देखील नुकसान झाले. ऑक्टोबर महिन्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पुढील चार ते पाच दिवसात राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेरची कामे टाळा, पाऊस सुरू असताना घराबाहेर पडल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून घराबाहेर पडू नका. अशा प्रकारचे तीव्र हवामान संपूर्ण दिवस असेल, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.