नगरसेविका नम्रता लोंढे यांच्या पुढाकाराने इंद्रायणीनगरमध्ये २०० हून अधिक नागरिकांचा भाजपात प्रवेश

पिंपरी: प्रतिनिधी/  पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंद्रायणीनगरमधील सुमारे २०० हून अधिक नागरिकांनी भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश केला. स्थानिक नगरसेविका नम्रता लांढे यांच्या पुढाकाराने संबंधितांनी ‘कमळ’ हातात घेतले.

महापालिका प्रभाग क्रमांक- ८ मधील नगरसेविका नम्रता लोंढे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च न करता विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यावेळी परिसरातील विविध सामाजिक संस्था- संघटनांशी संबंधित नागरिकांनी भाजपामध्ये प्रवेश करीत पक्षकार्यात सक्रीय होण्याचा संकल्प केला.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, माजी महापौर राहुल जाधव, शहर सुधारणा समिती सभापती प्रा. सोनाली गव्हाणे, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, नगरसविका सारिका बोऱ्हाडे, सारिका लांडगे, नगरसेवक राजेंद्र लांडगे, राष्ट्रवादीचे नगरसेवक संजय वाबळे, शिवसेना युवा नेते तुषार सहाणे, वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य आनंदा यादव, बाबूराव लोंढे, योगेश लांडगे, युवा मोर्चाच्या पुजा आल्हाट, गीता महेंद्रु, स्वरुपा महेदर्गी, हनुमंत लांडगे, पंकज पवार, संतोष वरे आदी उपस्थित होते.

परिसरातील प्रभू पाटील, रमण चिल्लर्गे, शिवकांत कपलापुरे, शिवा मानकर, श्रीकांत बिराजदार, अमृत हेग्गा, कल्लप्पा मुतळंबे आदींसह २००हून अधिक नागरिकांनी भाजपात प्रवेश केला.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, तळागाळातील नागरिकांना पायभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नगरसेविका नम्रता लोंढे आणि सामाजिक कार्यकर्ते योगेश लोंढे यांनी प्रामाणिक काम केले आहे. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांच्या माध्यमातून प्रभागातील विविध विकासकामे मार्गी लागली आहेत. लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करुन सामाजिक बांधिलकी जपली आहे. कोरोना काळात लोंढे यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. कोकणातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी योगेश लोंढे यांनी परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने मोठी मदत उभा केली होती, अशा शब्दांत आमदार लांडगे यांनी लोंढे दांम्पत्याच्या कार्याचे कौतूक केले.

नगरसेविका नम्रता लोंढे म्हणाल्या की, वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळून समाजहिताचे उपक्रम आयोजित केले होते. आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या चार वर्षांमध्ये लोकहिताच्या दृष्टीने आम्ही सकारात्मक भूमिकेतून वाटचाल केली आहे.

नोकरी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

नगरसेविका नम्रता लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित नोकरी महोत्सवात एकाच दिवसात तब्बल ३८८ तरुणांना नोकरीची संधी मिळाली. तसेच, १९९ तरुणांना मुलाखतीसाठी संबंधित कंपन्यांनी बोलावले आहे. नोकरी महोत्सवात एकूण २९ कंपन्यांनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे, ९८० तरुण- तरुणींनी नोकरी महोत्सवासाठी नाव नोंदणी केली.

आरोग्य शिबिराचा ३ हजार ४५६ जणांना लाभ…

परिसरातील नागरिकांच्या नागरी आरोग्य रक्षणासाठी दोन दिवसीय महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. त्याअंतर्गत विविध तपासणींमध्ये तब्बल ३ हजार ४५६ नागरिकांनी सहभाग घेतला. तसेच, प्रभागातील एकूण ८० आरोग्य महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच, परिसरातील ५२२ ज्येष्ठ नागरिकांचाही सन्मान करण्यात आला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!