साई मंदिर भक्तांसाठी ‘या’ तारखेपासून खुले, रोज किती भाविकांना प्रवेश मिळणार? जाणून घ्या….

5

शिर्डी: गेल्या अनेक महिन्यापासून बंद असलेली साईमंदिराची कवाडे घटस्थापनेपासून अर्थात 7 ऑक्टोबरपासून खुले होणार आहे. त्यामुळे शिर्डीतील व्यावसायिक, भाविक आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिर्डीचे साईसंस्थान प्रशासन, आरोग्य व्यवस्था, नगरपालिका प्रशासन मंदिर उघडण्यासाठी सज्ज झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रवेशासाठी काही नियमावली करण्यात आली आहे. यानुसार मंदिरात मर्यादित भाविकांना दर्शन घेता येणार आहे.

संस्थानच्या नियमावलीनुसार दररोज 15 हजार भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. त्यात 5 हजार भक्तांना ऑनलाईन नोंदणीद्वारे, 5 हजार भक्तांना सशुल्क पासद्वारे तर 5 हजार भक्तांना ऑफलाईन पद्धतीने मोफत दर्शन मिळणार आहे. दर तासाला दीड हजार भाविकांना दर्शनाचा लाभ मिणार आहे.

साईबाबांची काकड आरती, मध्यान्ह आरती, सायंआरती आणि शेजारतीला 80 भाविकांना सशुल्क प्रवेश देण्यात येईल. प्रत्येक आरतीला 10 गावकऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. 65 वर्षावरील नागरिकांना आणि 10 वर्षाखालील बालकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. त्याचबरोबर सर्व साई भक्तांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे. मंदिरात फुलं, हार, तसंच प्रसाद घेऊन जाण्यासही मनाई करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे बाहेरुन येणाऱ्या भाविकांसाठी भक्तनिवासही सुरु करण्यात येणार असल्याची माहिती साई संस्थानकडून देण्यात आलीय. साई मंदिर प्रशासनाकडून घटस्थापनेला मंदिर सुरु करण्याची तयारी पूर्ण झाली आहे, तशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिलीय.

Get real time updates directly on you device, subscribe now.