नोकरीचे आमिष दाखवून जालन्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, तिघांना अटक

जालना: जालना येथे मुंबईच्या एका अल्पवयीन मुलीला नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरुन तीन आरोपींना अटक केली असून या गुन्ह्यातील एक आरोपी अद्याप फरार आहे.

याप्रकरणी त्या मुलीच्या फिर्यादीवरुन जालना शहरातील तीन जणांना कदीम पोलिसांनी सोमवारी सकाळी बेड्या ठोकल्या. अविनाश जोगदंड, किशोर जोगदंड, गणेश मामा , दीपक राणा अशी संशयितांची नावे आहेत. दीपक सध्या फरार आहे. दरम्यान याबाबत औरंगाबादच्या सिडको पोलिस ठाण्यात झीरो एफआयआर दाखल झाला.

आरोपींनी नोकरी लावण्याचे आमिष दाखवल्याने मुंबईतून दोन अल्पवयीन मुली जालन्यात आल्या होत्या. त्या एकट्या असल्याचा फायदा घेऊन आरोपी अविनाश जोगदंड, किशोर जोगदंड, दीपक राणा, गणेश (मामा) गणेश काकडे,  यांनी विविध ठिकाणी नेऊन त्यापैकी एका मुलीवर आरोपींनी सामूहिक अत्याचार केला असल्याचा आरोप या युवतीने दिलेल्या फिर्यादीत केला.

काल रात्री उशिरा हा गुन्हा कदीम जालना पोलिस ठाण्यात वर्ग होताच गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक योगेश चव्हाण, बाबा गायकवाड यांनी संशयित आरोपी अविनाश काकासाहेब जोगदंड यास नांदेड येथून रेल्वेने येत असताना जालना रेल्वेस्थानकावर ताब्यात घेतले, तर शुभम काकासाहेब जोगदंड आणि गणेश (मामा) यांना सकाळी सदर बाजार पोलिसांनी अटक केल्याची माहिती एपीआय चव्हाण यांनी दिली. सध्या हे आरोपी कदीम पोलिसांच्या ताब्यात आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रियांका तुपे करीत आहेत. दरम्यान, या आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.