गुजरातमध्ये सापडलेल्या २१ हजार कोटींच्या ड्रग्जचं काय झालं?; संजय राऊत म्हणतात…

मुंबई: उत्तर प्रदेशातल्या लखीमपूर खिरी इथल्या घटनेवरुन  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केले. तसेच राज्यात सुरु झालेल्या ड्रग्स प्रकरणावरही त्यांनी भाष्य केल. ते मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते.

देशात अमली पदार्थांचा काळाबाजार अद्यापही सुरूच आहे. जगातील सर्वात मोठा ड्रग्ज साठा सापडला त्यासंदर्भात केंद्र सरकारने कोणतेही ठोस पाऊले उचलले नाहीत . उत्तर प्रदेशात जिवंत शेतकरी चिरडले गेले. पण त्याच वेळी देशातील मीडिया शेतकऱ्यांच्या मागे उभा न राहता ड्रग्ज प्रकरणाला जास्त प्राधान्य देत आहे . गुजरातमध्ये 21 कोटींचे ड्रग्स सापडले त्याचे काय? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.

संजय राऊतांचा मीडियावर हल्लाबोल

यापेक्षा मोठा धक्का असा की, शेतकरी आंदोलन करीत असताना केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने भरधाव गाडी शेतकऱ्यांच्या आंदोलनात घुसवून शेतकऱ्यांना ठार केले. त्यामुळे आंदोलक भडकले व हिंसाचार झाला. इतके मोठे मृत्युकांड होऊनही देशातला मीडिया शाहरुख खानच्या मुलाने 13 ग्रॅम ड्रग्ज घेतल्याच्या बातम्यांचा पाठलाग करीत आहे. उत्तर प्रदेशात मंत्रीपुत्राने चार शेतकरी चिरडून मारले, यापेक्षा शाहरुख खानच्या पोराचे प्रताप या मंडळींना महत्त्वाचे वाटतात. शाहरुख खानचा मुलगा व त्याच्या नशेबाज मित्रमंडळींचे कृत्य हा श्रीमंतांचा माज आहे. त्यांच्यावर कायद्याने कठोरात कठोर कारवाई होईलच, पण शाहरुख पुत्राच्या कृत्याचे ढोल बडविताना मीडियाने उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या निर्घृण हत्यांवर जणू पडदाच टाकण्याचा प्रयत्न केला. लखीमपूर खेरीतील शेतकऱ्यांच्या हत्यांनी देश हादरला आहे.

शेतकऱ्यांना मारायचं, त्यांची मुस्कटदाबी करायची, ही कसली लोकशाही?

महाराष्ट्रातील भाजप नेते मराठवाडा, विदर्भातील संकटग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी बांधावर पोहोचले तेव्हा त्यांना कोणी रोखले नाही, पण उत्तर प्रदेशात शेतकरी चिरडून मारले गेले. त्यांच्यापर्यंत विरोधकांना, शेतकरी नेत्यांना पोहोचू दिले जात नाही. शेतकऱ्यांना मारायचे व राजकीय विरोधकांची मुस्कटदाबी करायची ही कसली लोकशाही? केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने केलेला हा अपराध दुसऱ्या एखाद्या राज्यात घडला असता तर भाजपने देश डोक्यावर घेतला असता. आता शेतकऱ्यांनाच गुन्हेगार, अराजकवादी ठरविण्यासाठी आटापिटा सुरू आहे.