पालघरमध्ये शिवसेनेला मोठा धक्का; शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांच्या मुलाचा पराभव

पालघर: पालघर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत अत्यंत रंजक निकाल लागला आहे. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपला समसमान जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला खातंही खोलता आलेलं नाही. दुसरीकडे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांचे चिरंजीव रोहित गावित यांचा पराभव झाल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
वणई गटात भाजपचे पंकज कोरे यांनी खासदार राजेंद्र गावित यांच्या मुलाचा दारुण पराभव केला. हाती आलेल्या माहितीनुसार, पंकज कोरे हे विजयी झाले असून ४१२ मतांनी पंकज कोरे यांनी विजय पटकावला आहे. राजेंद्र गावित यांच्या मुलाला म्हणजेच रोहित गावित या वणई गटातून उमेदवारी देण्यात आली होती. पण इथे जनतेनं त्यांना नाकारलं आहे. त्यामुळे याचा थेट फटका शिवसेनेला बसणार असल्याची राजकीय चर्चा सुरू आहे.
खरंतर, रोहित गावित यांचा जनतेशी कोणत्याही प्रकारचा जनसंपर्क नव्हता. तरीही त्याला तिकीट देण्यात आलं होतं. त्यामुळे शिवसेनेसाठी ही मोठी पोकळी मानली जाते. शिवसेनेला आगामी निवडणुकांच्या काळात याचा मोठा फटका बसू शकतो.
शिवसेनेचं यश समाधानकारक
पालघर जिल्हा परिषदमध्ये समाधान कारक निकाल लागला आहे. शिवसेनेने 5 जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीने एकूण 11 जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेला मात्र चांगले यश मिळाले आहे, असं राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी खासदार गावित यांच्या चिरंजीवांच्या पराभवावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. गावित यांचा पराभव झाला आहे. परंतु, आता या जागेवर आम्ही पुन्हा जोमाने काम करू. शेवटी जनतेने दिलेला कौल आहे. ते मान्य करावे लागेल. मात्र, ही जागा पुढीलवेळी जिंकण्यासाठी आम्ही पुन्हा प्रयत्न करू, असंही ते म्हणाले.