मुंबईकडून राजस्थान चारीमुंड्या चीत! ८ गडी राखून विजयी, प्लेऑफच्या आशा कायम

4

मुंबई: मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सवर 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. राजस्थानने मुंबईला विजयासाठी 91 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान मुंबईने 2 विकेट्सच्या मोबदल्यात 8.2 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. मुंबईने 70 चेंडू शेष ठेवून हा सामना जिंकला. पलटणने मोठ्या फरकाने सामना जिंकल्याने प्लेऑफमध्ये पोहचण्याच्या आशा या कायम आहेत. तर राजस्थानचा पराभव झाल्याने त्याचं या 14व्या मोसमातील आव्हान संपुष्टात आलंय.

विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या मुंबईची आश्वासक सुरुवात झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन या सलामी जोडीने 23 धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर रोहित शर्मा 22 धावा करुन बाद झाला. सूर्यकुमार मैदानात आला. ईशानने सूर्यकुमारसह धावफळक धावता ठेवला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 33 धावांची भागीदारी केली. यानंतर सूर्या 13 धावांवर आऊट झाला. त्यामुळे मुंबईचा स्कोअर  2 बाद 56 असा झाला.

सूर्यानंतर हार्दिक मैदानात आला. मात्र तोवर सामना मुंबईच्या बाजूने झुकला होता. एका बाजूला विकेट जात असताना ईशान फटकेबाजी करत होता. मुंबई विजयाच्या उंबरठ्यावर होती. तर ईशानला अर्धशतकासाठी 6 धावांची आवश्यकता होती. यावेळेस ईशानने सिक्स ठोकत मुंबईला विजय मिळवून दिला. सोबतच  25 चेंडूत नाबाद अर्धशतकही पूर्ण केलं.

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.