डोंबिवलीत किरकोळ वादातून मित्रानेच केली मित्राची निर्घृण हत्या

डोंबिवली: रेल्वे परिसरात किरकोळ वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोमवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास ठाकुर्ली ९० फिट रोडवरून रिक्षातून जात असताना या दोन्ही मित्रांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यात बेचनप्रसाद चौहान या तरुणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी डोंबिवली टिळक नगर पोलीस व रेल्वे पोलिसांनी तपास सुरु केला आहे. तपासादरम्यान चोरीचा उद्देशाने ही हत्या झाल्याचा पोलिसांना संशय होता.
पोलिसांनी दिलेल्यामाहितीनुसार, घटनेतील बबलू चौहान या मित्राची अधिक चौकशी केली असता त्यानेच मित्र बेचनप्रसाद चौहानचा खून केल्याचे उघड झाले आहे. डोबिंवलीतील शेलारनाका परिसरात बेचन प्रसाद चौहान आणि बबलू चव्हाण हे दोघं मित्र भाड्याने राहत होते. दोघेही मुळचे उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. डोंबिवलीमध्ये ते फर्निचर बनवण्याचे काम करायचे.
बेचन प्रसाद चौहान आणि बबलू चव्हाण हे दोघं मित्र काल रात्री दीडच्या गाडीने कल्याण रेल्वे स्थानकाहून उत्तरप्रदेशात जाण्यासाठी निघाले होते. यावेळी शेलारनाका परिसरातून त्यांनी साडे बाराच्या सुमारास रिक्षा पकडली. बेचेन आणि बबलू चौहान दोघेही दारु पिऊन होते. रिक्षातून जात असतानाही ते एकमेकांशी भांडत होते.
यावेळी रिक्षा चालकास हे दारु पिऊन असल्याचे समजल्याने रिक्षा चालकाने त्यांनी रिक्षातून खाली उतरवले. पुढेही दोघांमधील भांडण अधिकचं वाढले. यावेळी बबलू प्रसाद चौहान याने आपला मित्र बेचेन चौहान याला जीवे ठार मारले. आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यास डोंबिवलीतील रेल्वे पटरीवर फेकून दिले असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी मित्र बबलूने मयत मित्र बेचेनच्या डोक्यावर आणि शरीरावर गंभीर घाव घालत चेंदामेंदा केला होता. पोलिसांना या दोघांच्या बॅग आणि मोबाईल रेल्वे ट्रॅकवर आढळून आल्या आहेत.