बहिणाबाई चौधरी सर्पोद्यानाचे काम लवकरात लवकर पूर्ण करा; आमदार महेश लांडगे यांची मागणी
पिंपरी: संभाजीनगरमधील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान व प्राणी संग्रहालयाचे काम कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे सर्प, पक्षी व प्राण्यांचे दर्शन गेल्या ७ वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे निसर्गप्रेमींमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे बहिणाबाई चौधरी सर्पोद्यानाचे काम जलदगतीने पूर्ण करावे, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, संभाजी नगरमधील सुमारे ७ एकर क्षेत्रावर हे सर्पोद्यान आहे. सर्पोद्यानाचे प्राणीसंग्रहालयात रुपांतरीत करुन सुशोभीकरण केल्याने पर्यटन वाढीस लागेल, या उद्देशाने त्यांच्या कायापालट करुन नूतनीकरण करण्यात येत आहे. सर्पोद्यानाला केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची मान्यता मिळाली आहे. प्राधिकरणाच्या नियम व अटीनुसार प्राणिसंग्रहालय उभारले जात आहे. सर्पोद्यानात विविध जातीचे एकूण ५५ सर्प, २ मगरी तसेच पक्षी व इतर प्राणी धरुन १८५ प्राणी व पक्षी सध्या आहेत. संत गतीने काम सुरू असल्यामुळे सर्वत्र झाडीझुडपी उगवली आहेत. तसेच, बांधकामांचा राडारोडा व साहित्य सर्वत्र विखुरलेले आहे.
प्रशासनाकडून प्राणीसंग्रहालयासाठी प्राशासकीय इमारत, स्टोअरेज रूम व स्टाफ क्वॉर्टर, पक्षांसाठी स्वतंत्र कक्ष, मगर व सुसर कक्ष, सर्पालय, अंतर्गत पादचारी मार्ग, स्वच्छतागृह या कामांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण होत आली आहेत. मात्र, दुसऱ्या टप्यातील कामांना गती देणे अपेक्षीत आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.