हात जोडून वारकरी संप्रदायाची माफी मागते! Bigg Boss मधून बाहेर पडल्यानंतर शिवलीला पाटील यांची क्षमायाचना

मुंबई: मराठी बिस बॉस च्या तिसऱ्या पर्वाने सध्या प्रेक्षकांच्या मनात चांगलंच घर निर्माण केलं आहे. काही दिवसांपूर्वी या घरातून स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या युवा किर्तनकार शिवलीला पाटील तब्येतीच्या कारणामुळे घराबाहेर पडल्या. परंतू शिवलीला पाटील घरात आल्यापासून त्यांचं बिग बॉस कार्यक्रमात सहभागी होणं अनेकांचा रुचलं नव्हतं. वारकरी संप्रदायातील अनेक लोकांनी सोशल मीडियावर याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. घरातून बाहेर पडल्यानंतर शिवलीला पाटील यांनी वारकरी संप्रदायाची माफी मागितली आहे. त्या एबीपी माझा वाहिनीशी बोलत होत्या.

माझ्या बिग बॉस मराठी या कार्यक्रमात जाण्याच्या निर्णयामुळे वारकरी संप्रदाय दुखावला असेल तर मी त्यांची माफी मागते. माझा मार्ग चुकला असला तरीही माझा हेतू शुद्ध होता. यापुढे ज्येष्ठांचा सल्ला घेतल्याशिवाय मी असा कोणताही निर्णय घेणार नाही. वारकरी संप्रदायातले अनेक ज्येष्ठ माझ्यावर नाराज आहेत. त्या सर्वांची मी दोन्ही हात जोडून नतमस्तक होत माफी मागते. माझे विचार लोकांपर्यंत पोहचवणे हाच माझा त्यामागचा प्रामाणिक उद्देश होता.

शिवलीला पाटील – युवा किर्तनकार

बिग बॉस च्या घरात स्पर्धकांना टिकून राहण्यासाठी अनेक दिव्य टास्क खेळावे लागतात. सुरुवातीच्या काही आठवड्यांमध्ये शिवलीला यांनाही या टास्कमध्ये सहभाग घ्यावा लागला. परंतू आपल्या किर्तनामधून भारतीय पंरपरा, संस्कृती, स्त्रियांनी कसं वागावं यावर उपदेश करणाऱ्या शिवलीला यांचं वेगळंच रुप बिग बॉसच्या निमीत्ताने लोकांना पहायला मिळालं.

अनेक वारकऱ्यांनी यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली. शिवलीला यांचे जुने व्हिडीओ एडीट करुन ते व्हायरलही करण्यात आले. अनेक लोकांनी शिवलीला यांच्यावर लोका सांगे ब्रम्हज्ञान, स्वतः कोरडे पाषणा अशीही टीका केली. त्यामुळे शिवलीला पाटील यांचं बिग बॉसच्या घरात राहणं हे अनेकांना रुचलं नव्हतं. त्यामुळे माफी मागितल्यानंतर हा वाद आता थांबतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

शिवलीला पाटील या अत्यंत लोकप्रिय महिला किर्तनकार असून त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल आहेत. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हे शिवलीला पाटील यांचं मूळ गाव आहे. शिवलीला यांचे संत साहित्य, भारतीय संस्कृती यावरचे अनेक व्हिडीओ व्हायरल आहेत. बिग बॉसच्या घरात असताना शिवलीला पाटील आणि महिला कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्यात इंदोरीकर महाराजांच्या किर्तनावरुनही वाद झाला होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!