धावपट्टीच्या दुरुस्तीसाठी लोहगाव विमानतळ २९ ऑक्टोबरपर्यंत बंद

पुणे: लोहगाव विमानतळ धावपट्टीच्या दुरुस्ती कामासाठी १६ ते २९ ऑक्टोबरदरम्यान पूर्ण बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या काळात येथून एकही विमान उड्डाण होणार नाही, अशी माहिती विमानतळ प्रशासनाने दिली. मात्र याचा फटका या कालावधीत आगाऊ तिकीट घेतलेल्या प्रवाशांना बसला आहे.

या धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम अनेक वर्षांपासून बाकी होते. विमानतळ प्रशासनाकडून देखील याचे नियोजन करण्यात आले होते. या आधी २६ एप्रिल ते ९ मे असे १४ दिवसांसाठी पुणे विमानतळ बंद ठेवण्यासाठी नियोजन केले होते. परंतु वेळेत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा व इतर आवश्‍यक साहित्यांचा पुरवठा करण्यासाठी विमानतळ प्रशासनाने धावपट्टीच्या दुरुस्तीच्या कामाला काही काळासाठी पुढे ठकलले होते.

तसेच रात्री आठ ते सकाळी आठ वाजेपर्यंत विमानसेवा बंद करत दुरुस्तीच्या कामाचे नियोजन देखील करण्यात आले होते. मात्र, ते शक्य न झाल्यामुळे आता भारतीय हवाईदल आणि विमानतळ प्रशासनाच्या वतीने शनिवारपासून ते येत्या २९ ऑक्टोबरपर्यंत विमानतळ बंद करण्यात आले आहे. तर सध्याचे नियोजन पाहता ३० ऑक्टोबरपासून विमान सेवा पुन्हा सुरू होतील, असे हवाईदलाकडून सांगण्यात आले आहे.