सहा वाहनं एकमेकांना धडकून मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, ३ जणांचा मृत्यू

1

पुणे: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटजवळ सोमवारी सकाळी सहा वाहने एकमेकांवर आदळली. तीन कार, एक खासगी बस, एक टेम्पो आणि एक ट्रेलर अपघातात होते. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आणि सहा जण जखमी झाले. जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे दोघांची प्रकृती गंभीर आहे.

आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या भरधाव येणाऱ्या कोंबड्या वाहून नेणाऱ्या टेम्पोने पुढे जाणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे टेम्पो स्विफ्ट कारला धडकला, तर दुसऱ्या टेम्पोने कॉईल वाहून नेणाऱ्या ट्रकला धडक दिली. त्याचवेळी एका ट्रकने खासगी बसला पाठीमागून धडक दिली.

या विचित्र अपघातात स्विफ्ट कार ही दोन टेम्पोच्यामध्ये अडकल्याने कारचा चक्काचूर झाला आहे, तर कारमधील दोन प्रवासी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर टेम्पो चालकाचा देखील या अपघातात मृत्यू झाला आहे.

या अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस, देवदूत यंत्रणा आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी असलेल्या सामाजिक संघटनेच्या सदस्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन कार आणि टेम्पोमधील अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. या अपघातामध्ये एकूण सहा प्रवासी जखमी झाले असून तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर पहाटे झालेल्या अपघातामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक सुमारे तासभर विस्कळीत झाली होती. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.