सीबीएसई दहावी बारावी, परीक्षेच्या पहिल्या सत्राच वेळा पत्रक जाहीर

मुंबई: सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा यंदा नियोजित वेळेप्रमाणेच होणार आहे. बोर्डाने 10वी आणि 12वी परीक्षेच्या तारखा काल जाहीर केल्या आहेत. परीक्षेचं वेळापत्रक केंद्रीय शिक्षण मंडळाकडून प्रसिद्ध करण्यात आलं असून, दहावीची परीक्षा 30 नोव्हेंबरपासून, तर बारावीची टर्म 1 परीक्षा 1 डिसेंबरपासून होणार आहे.

सीबीएसई बोर्डाने 10वी, 12वी परीक्षेची डेटशीट काल प्रसिद्ध केली. डेटशीटनुसार दहावीच्या परीक्षा दिवाळीनंतर म्हणजेच 30 नोव्हेंबर, तर 12 बारावीची परीक्षा 1 डिसेंबरपासून घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळापत्रकाबद्दलची माहिती सीबीएसई बोर्डाने www.cbse.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.

निश्चित करण्यात आलेल्या परीक्षा केंद्रावर निर्धारित करण्यात आलेल्या वेळेनुसार परीक्षा होणार आहे. ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होणार असून, प्रश्न सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना 90 मिनिटांचा वेळ असणार आहे, तर प्रश्न वाचण्यासाठी 20 मिनिटांचा वेळ असणार आहे. अभ्यासक्रमावर आधारित 50 प्रश्न असणार आहेत. परीक्षा सकाळी 11.30 वाजता सुरू होऊन दुपारी 1 वाजता संपेल.

सीबीएसईने 18 ऑक्टोबरला म्हणजेच काल महत्त्वाच्या विषयांची डेटशीट प्रसिद्ध केली आहे. महत्त्वाचे विषय सीबीएसईशी संबंधित सर्व शाळांमध्ये शिकवले जातात. तर मायनर विषय निवडक शाळांमध्येच शिकवले जातात. मायनर विषयाबद्दलच्या परीक्षांची तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे.