लग्नासाठी घेतलेल्या 50 हजाराच्या साड्या आणि रोख तीन लाख रिक्षात विसरले, अन् काही तासात…..

पुणे: लग्नाच्या खरेदीसाठी ते पुण्यात आले होते. परंतु लग्नासाठी घेतलेल्या 50 हजाराच्या साड्या आणि रोख तीन लाख रुपये अनवधानाने रिक्षात विसरले. त्यानंतर घाबरलेल्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. डेक्कन पोलिसांनी अवघ्या काही तासात रिक्षाचालकाचा शोध लावून रोख रक्कम आणि साड्या संबंधित व्यक्तीला परत मिळवून दिल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तासगाव तालुक्यातील विश्वजीत दिलीपराव पवार हे काही मित्रांसोबत लग्नाचे कपडे खरेदी करण्यासाठी पुण्यात आले होते. पुण्यात खरेदी केल्यानंतर ते जंगली महाराज रस्त्यावरील एका हॉटेलात कुटुंबासोबत नाष्टा करण्यासाठी थांबले होते. यावेळी त्यांनी घेतलेल्या साड्या आणि रोख तीन लाख रुपये असलेली पिशवी रिक्षातच विसरले होते.

त्यानंतर विश्वजीत पवार यांनी तात्काळ डेक्कन पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यांना रिक्षाचा नंबर ही आठवत नव्हता. त्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले आणि रिक्षाचा नंबर मिळवला. त्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी ॲपवरून रिक्षाचालकाचे तपशील मिळवला. त्यानंतर संबंधित रिक्षाचालक राहात असलेल्या खराडी येथील घरी जाऊन रिक्षामध्ये अनवधानाने विसरलेले रोख रक्कम आणि साड्या ताब्यात घेऊन विश्वजीत पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आले.