पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, दिवाळीच्या मुहूर्तावर म्हाडाच्या 3 हजार पेक्षा जास्त घरांची लॉटरी

पुणे: या दिवाळीत तुमचं घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे, कारण  दिवाळीच्या  मुहूर्तावर  3 हजार पेक्षा जास्त घरांची लॉटरी पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्यावतीने काढण्यात येत आहे. म्हाडाच्यावतीने ही घरांची लॉटरी काढण्यात येत असल्याने याची मोठी उत्सुकता आहे. एका वर्षांत घरांच्या लॉटरीची  हॅटट्रिक करण्यात आली आहे. कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती खूपच बिघडली आहे. अशा स्थितीत गरीब आणि आर्थिक दुर्बल घटकातील लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुणे म्हाडाने पुढाकार घेतला आहे.

ऐन कोरोना काळात जानेवारी 2020मध्ये म्हाडाच्यावतीने तब्बल 5 हजार 657 घरांची सोडत काढण्यात आली होती.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काढण्यात आलेल्या लॉटरीला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर म्हाडाने प्रथमच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणे, पिंपरी-चिंचवडसह विभागातील सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल अडीच हजार घरांची सोडत काढली होती. त्यानंतर आता दिवाळीचा मुहूर्त साधत पुणे म्हाडा आणखी तीन हजारपेक्षा जास्त घरांसाठी लॉटरी काढत आहे.

सरकारने केलेल्या कायद्याची कडक अंमलबजावणी करत सर्व मोठ्या बिल्डरांकडून 20 टक्क्यांतील घरे सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध करून देणे हा उद्देश ठेवला. त्यामुळे आता ही घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये 1500 घरे 20 टक्क्यातील आणि सर्व नामांकित तसेच मोठ्या बिल्डरांच्या प्रकल्पातील असल्याची माहिती देण्यात आली आहे.