उस्मानाबादमध्ये झेंडा लावण्यावरून तुफान दगडफेक; सहा पोलीस जखमी

5

उस्मानाबाद: उस्मानाबाद शहरात झेंडा लावण्याच्या किरकोळ कारणावरून काल (19 ऑक्टोबर) रात्री उशिरा दोन गटात तुफान दगडफेक झाली. दरम्यान या दगडफेकीत असून सहा पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचे समजते आहे. दोन गटात अचानक झालेल्या तुफान दगडफेकीच्या घटनेने संपूर्ण उस्मानाबाद शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच उस्मानाबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

कोजागिरी पौर्णिमा आणि ईद या दोन सणावेळी दोन्ही समाजाचे झेंडे लावण्याच्या कारणावरून काल (मंगळवारी) दुपारी दोन गट विजय चौक येथे आमनेसामने आले. त्यावरुन दोन्ही गटाकडून काही पोस्ट सोशल मीडियामध्ये व्हायरल करण्यात आल्या. त्यानंतर झेंडा लावण्याच्या कारणावरून दगडफेक झाली. मात्र सध्या स्थिती नियंत्रणात असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांनी आवाहन केले आहे.

दरम्यान, या संपूर्ण घटनेबाबत पोलिसांनी नागरिकांना आवाहन करताना असं म्हटलं आहे की, ‘नागरिकांना नम्र आवाहन आहे की, कृपा करुन दगडफेक करु नका. पोलिसांना सहकार्य करा. फेसबुकवर जी काही कमेंट आली आहे त्यावर रितसर कारवाई करण्यात येत आहे.’ तसेच ज्यांनी कायदा हातात घेऊन ज्या कोणी दगडफेक केली आहे त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार आहे.

दुसरीकडे आता पोलिसांनी याप्रकरणी चिथावणीखोर भाष्य करणाऱ्यांवर कारवाई सुरु केली असून काही जणांची धरपकड देखील केली असल्याचं समजतं आहे. तसेच या संपूर्ण घटनेचे पडसाद शहरात इतरत्र कुठेही उमटू नयेत यासाठी देखील पोलिसांनी अनेक संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.