महागाईचा भडका, तब्बल १४ वर्षांनी काडीपेट्यांची किंमतही वाढली

मुंबई: आधीच महागाईने  सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे.  त्यात आणखी एकदा  जनतेच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, भाज्यांनंतर आता अत्यंत जीवनावश्यक वस्तू असणाऱ्या काडीपेट्यांचा भडका उडाला आहे.  तब्बल १४ वर्षांनंतर काडीपेट्यांच्या किमती वाढल्या आहेत. याआधी २००७ साली काडीपेट्यांच्या दरात वाढ झाली होती.

कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीमुळे ही वाढ करण्यात आल्याचे उद्योगाच्या प्रतिनिधींनी म्हटले आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार, १ डिसेंबरपासून काडीपेट किंमत एक रुपयांनी वाढेल.  या वाढीनंतर काडीपेट्यांची नवीन किंमत एक रुपयाने वाढवण्याचा निर्णय ऑल इंडिया चेंबर ऑफ मॅचेसच्या बैठकीत घेण्यात आला.

पाच प्रमुख मॅचबॉक्स उद्योग संस्थांचे प्रतिनिधी या बैठकीत सामील होते. काडीपेट्यांची किंमत वाढवण्याचा निर्णय त्यांनी एकमताने घेतला आहे.  कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने किमतींमध्ये वाढ करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. मुख्यतः लाल फॉस्फरस, मेण, बॉक्स बोर्ड इ. या सर्व कच्च्या मालाचे भाव वाढले आहेत. किंबहुना, डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे वाहतूकही महाग झाली आहे. यामुळेच कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत.

सुमारे १४ वर्षांनंतर काडीपेट्यांच्या किमती वाढणार आहेत. अहवालानुसार, काडीपेट्यांची किंमत २००७ साली वाढवण्यात आली होती. त्यानंतर काडीपेट्यांची किंमत ५० पैशांनी वाढवण्यात आली. दरम्यान, या सर्वांमध्ये सर्वसामानांचे बजेट पुन्हा एकदा कोलमडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.