ऑस्ट्रेलिया विश्वविजेते, न्यूझीलंडवर 8 गडी राखून विजय

3

मुंबई: युएईत पार पडलेल्या टी-२० विश्वचषकाचा मान अखेरीस अरॉन फिंचच्या ऑस्ट्रेलियन संघाला मिळाला आहे. अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर ८ विकेट राखून मात करत ऑस्ट्रेलियाने आपलं पहिलं वहिलं टी-२० चं विजेतेपद मिळवलं आहे. मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नरच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हे आव्हान सहज पूर्ण केलं. २०१० च्या टी-२० विश्वचषात ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम फेरीत पोहचला होता, परंतू त्यावेळी इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाला पराभव स्विकारावा लागला होता.

यंदाच्या संघात ऑस्ट्रेलियाचा संघ विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जात नसतानाही सर्व खेळाडूंनी धडाकेबाज खेळ करत आपलं आव्हान कायम राखत विजेतेपदावर मोहर उमटवली आहे. मिचेल मार्शने नाबाद ७७ धावांची खेळी करुन विजयात मोलाची भूमिका बजावली.

टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कॅप्टन अरॉन फिंचने पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. मार्टीन गप्टील आणि डॅरेल मिचेल यांनी अंतिम फेरीत सावध सुरुवात केली. जोश हेजलवूडने डॅरेल मिचेलला आऊट करत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. यानंतर केन विल्यमसन आणि मार्टीन गप्टील यांनी छोटेखानी भागीदारी करुन संघाचा डाव सावरला. मार्टीन गप्टीलच्या तुलनेत कर्णधार विल्यमसनने मैदानात स्थिरावल्यानंतर काही सुंदर फटके खेळले. ही जोडी मैदानात स्थिरावते आहे असं वाटत असतानाच झॅम्पाने मार्टीन गप्टीलला आऊट केलं.

प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवातही अडखळत झाली. कर्णधार अरॉन फिंच हा पाकिस्तानविरुद्ध सामन्यापाठोपाठ अंतिम सामन्यातही अपयशी ठरला. ट्रेंट बोल्टने फिंचला ५ रनवर आऊट केलं. यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी पुन्हा एकदा महत्वाची भागीदारी करुन संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत मैदानाच चौफेर फटकेबाजी केली. दोघांनीही ऑस्ट्रेलियाला शतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला. ही जोडी ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देणार असं वाटत असतानाच ट्रेंट बोल्टने वॉर्नरला क्लिन बोल्ड केलं. वॉर्नरने ३८ बॉलमध्ये ४ फोर आणि ३ सिक्स लगावत ५३ रन्स केल्या.

दुसऱ्या बाजूने मिचेल मार्शनेही आपली फटकेबाजी सुरु ठेवत अर्धशतक पूर्ण केलं. यानंतर मिचेल मार्शने ग्लेन मॅक्सवेलच्या साथीने चौफेर फटकेबाजी करत सामन्यातलं न्यूझीलंडचं आव्हान जवळपास संपवूनच टाकलं. ट्रेंट बोल्ट आणि साऊदीसह सर्वच बॉलर्सची धुलाई करुन ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या टी-२० विश्वचषकावर शिक्कामोर्तब केलं.

Get real time updates directly on you device, subscribe now.