गुजरातमध्ये एटीएसची मोठी कारवाई! तब्बल 600 कोटींचे ड्रग्ज जप्त

6

मुंबई: मुंद्रा पोर्टवरील 3000 कोटी हेरॉईन  सापडल्याच्या घटनेला महिना होत नाही, तोच गुजरातमध्ये पुन्हा एकदा 600 कोटी रुपये बाजारमूल्य असलेलं 120 किलो हेरॉईनचा साठा जप्त करण्यात आला आहे. गुजरातमधील मोरबी जिल्ह्यातील झिनझुदा गावात गुजरात एटीएसने ही कारवाई केली आहे. हे हेरॉईन पाकिस्तानातून आल्याचं प्राथमिक चौकशीतून समोर आलं आहे.

या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. मुख्तार हुसैन ऊर्फ जब्बार जोडिया, शमसुद्दीन हुसैन सय्यद आणि गुलाम हुसैन उमर भगद अशी एटीएसने कारवाई दरम्यान अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. गुजरात एटीएसने स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.

गुलाम भगद आणि मुख्तार हुसैन यांनी हे हेरॉईन सुमुद्रीमार्गाने आणलं. पाकिस्तानी बोटीतून ते भारतात आणलं. हेरॉईनचं हे पार्सल पाकिस्तानी नागरिक असलेल्या झाहीद बशीर बलोच याने पाठवलं असून, तो 2019 मध्ये जप्त करण्यात आलेल्या 227 किलो हेरॉईन प्रकरणात फरार आहे, अशी माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आली असल्याचं गुजरात एटीएसने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

पाकिस्तानातून आणण्यात आलेलं हे हेरॉईन भारतीय तस्करांकडे सुपूर्द केलं जाणार होतं. त्यानंतर ते आफ्रिकन देशात पाठवण्यात येणार होतं, असं गुजरात एटीएसने म्हटलं आहे. या कारवाईनंतर गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी गुजरात पोलिसांचं अभिनंदन केलं आहे. ‘गुजरात पोलिसांचं आणखी एक यशस्वी कामगिरी. नशामुक्तीच्या दिशेनं गुजरात पोलीस काम करत असून, गुजरात पोलिसांनी जवळपास 120 किलो ड्रग्ज जप्त केलं आहे, असं गृहमंत्री संघवी यांनी म्हटलं आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.