पुण्यातला प्रताप! पतीचा घोटाळा लपवण्यासाठी पत्नीचा थयथयाट, माहिती अधिकार कार्यकर्त्यावरच उगारली चप्पल

पुणे: पतीने केलेला घोटाळा लपवण्यासाठी पत्नीने पुढाकार घेत सदर प्रकरण शोधून काढणाऱ्या माहिती अधिकाऱ्यालाच मारहाण केल्याचा प्रकार पुण्यात घडला. महापालिकेतील कथित घोटाळ्यासंबंधात नाव असलेल्या अभियंत्याच्या  पत्नीने माहिती कार्यकर्त्याला  चप्पलेनेच मारहाण केली असून वरून त्यानेच आपल्याला धक्का दिल्याचा बनाव केला. पुणे महापालिकेत शुक्रवारी माहिती अधिकार कार्यकर्ते शैलेंद्र दीक्षित  यांच्या बाबतीत हा प्रकार घडला.

माहिती अधिकाराखाली पुण्यात माहिती अधिकार कर्यकर्ते शैलेंद्र दीक्षित यांचं अपिल सुरु होतं. पुणे महानगरपालिका बांधकाम विकास विभाग झोन ७ मधील २०० कोटी रुपयांचा गैर व्यवहार झाल्याचा आरोप शैलेंद्र दीक्षित यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी माहिती मागवली होती. मात्र हा घोटाळा उघडकीस येण्यापूर्वीच संबंधित विभागातील कनिष्ठ अभियंत्याच्या पत्नीने शैलेंद्र यांना मारहाण केली. महापालिका कार्यालयातच पत्नीने चप्पलेने मारायला सुरुवात केली. पतीविरुद्ध अपिल का केले, याचा राग मनात धरून पत्नीने हे प्रकरण चांगलेच पेटवले.

आपण केलेला गैर व्यवहार लपवण्यासाठी सदर कनिष्ठ अभियंत्याने पत्नीला कार्यालयात बोलावल्याचा आरोप शैलेंद्र यांनी केला आहे. १२ नोव्हेंबर रोजी शुक्रवारी सदर प्रकरणी अपिल सुरु असताना अभियंत्याच्या पत्नीने महापालिकेच्या कार्यालयात घुसून असा थयथयाट केला. माहिती अधिकार कार्यकर्त्याला मारहाण तर केलीच, शिवाय मला धक्का का मारला, असा कथित बहाणा करून सदर कार्यकर्त्याची बदनामी करण्याचा प्रयत्न केला.