पुढचे तीन दिवस राज्यावर पावसाचं संकट, कोकण मुंबईसह अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई: राज्यात काही दिवसांपूर्वीच पावसाने विश्रांती घेतली, अशातच आता सर्वत्र अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे. अरबी समुद्रातून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे कर्नाटकच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. परिणामी याचा फटका आता महाराष्ट्राला सहन करावा लागणार आहे. महाराष्ट्राच्या कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरीत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर राज्यात इतर जिल्ह्यांवरही अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे.

अशातच हवामान विभागाने राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यात मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळणार आहेत. यामुळे आता बळीराजा संकटात सापडला आहे. उभे काढणीला आलेल्या पिकांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान होत आहे.

दिवाळीदरम्यानही राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र समुद्र किनाऱ्यावरील कमी दाबाचे क्षेत्र दूर सरकल्य़ाने कोकण किनारपट्टीवर त्याचा प्रभाव जाणवला नाही. मात्र पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र राज्याच्या किनारपट्टी भागाकडे सरकल्याने पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. यामुळे राज्यात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!