आज दिसणार 580 वर्षातील सर्वात मोठे आंशिक चंद्रग्रहण

मुंबई: खगोलशास्त्रीय आणि ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, आज आंशिक चंद्रग्रहण दिसणार आहे. हिंदी दिनदर्शिकेनुसार, हा दिवस कार्तिक पौर्णिमेचा दिवस आहे. महत्वाचे म्हणजे गेल्या ५८० वर्षातील हे सर्वात मोठे आंशिक चंद्रग्रहण असणार आहे. यापूर्वी १० फेब्रुवारी १४४० रोजी इतके मोठे आंशिक चंद्रग्रहण झाले होते. तसेच पुढच्या वेळी ते ८ फेब्रुवारी २६६९ रोजी होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा आंशिक चंद्रग्रहण होते. परंतु, यादरम्यान ते एका सरळ रेषेत येत नाही. चंद्राचा एक छोटासा भाग पृथ्वीच्या सावलीने झाकला जातो आणि आपल्याला लाल रंगाचा चंद्र दिसतो. याला फ्रॉस्ट मून आणि बीव्हर मून असेही म्हणतात.

येत्या शुक्रवारचे आंशिक चंद्रग्रहण उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया आणि प्रशांत क्षेत्रातून दिसणार आहे. तसेच भारतातील अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या काही भागातून हे आंशिक चंद्रग्रहण दिसणार आहे. याशिवाय उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमधील लोकांना चंद्रग्रहणाचा शेवटचा भाग पाहता येणार आहे. जेव्हा चंद्र, सूर्य आणि पृथ्वी अपूर्णरित्या एका रेषेत येतात, तेव्हा चंद्रग्रहणाचा अंतिम भाग दिसतो. या दरम्यान चंद्र पृथ्वीच्या सावलीच्या बाहेरील भागातून जातो. जगभरातील खगोलशास्त्रज्ञही या घटनेवर बारकाईने लक्ष ठेवणार आहेत.

भारतीय वेळेनुसार, हे आंशिक चंद्रग्रहण दुपारी १२:४८ वाजता सुरू होणार असून १६:१७ वाजता संपणार आहे. एमपी बिर्ला तारांगणाचे संशोधन आणि शैक्षणिक संचालक डॉ. देबीप्रसाद दुआरी यांनी सांगितले की, आंशिक ग्रहणाचा कालावधी ३ तास २८ मिनिटे २४ सेकंद असेल. यामुळे ते २१ व्या शतकातील सर्वात मोठे आणि जवळपास ६०० वर्षांतील सर्वात मोठे चंद्रग्रहण असणार आहे. पुढील संपूर्ण चंद्रग्रहण १६ मे २०२२ रोजी होणार असून ते भारतातून दिसणार नाही. मात्र, ८ नोव्हेंबर २०२२ रोजी होणारे संपूर्ण चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे.