धक्कादायक! वाघाच्या हल्ल्यात महिला वनरक्षक ठार, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील घटना

चंद्रपूर: वाघांसह जंगलाचं रक्षण करणाऱ्या वनरक्षकावरचं वाघानं हल्ला केला. ताडोबा जंगलातील कोअर झोनमध्ये आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. स्वाती ढुमणे असं वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या वनरक्षकाचं नाव आहे. या घटनेमुळं वनकर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.

चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात मोठी घटना घडली. व्याघ्रगणनेची पूर्वतयारी करण्यासाठी कोअर क्षेत्रात गेलेल्या महिला वनरक्षकावर वाघानं हल्ला केल्ला. हा वाघ पानवठ्याजवळ दबा धरून बसला होता. कोलारा कोअर झोनमध्ये झालेल्या या हल्ल्यात महिला वनरक्षकाचा बळी गेला.

महिला वनरक्षक स्वाती ढुमणे (वय 43) या चार वनमजुरांसोबत आज सकाळीच कोलारा कोअर झोनच्या कक्ष क्र. 97 मध्ये गेल्या. तिथं वॉटर होलजवळ पाणी आहे की, नाही याची पाहणी त्या करीत होत्या. दरम्यान, पाणवठ्याजवळ दबा धरून बसलेल्या वाघानं त्यांच्यावर हल्ला केला. स्वाती यांना पकडून ओढत जंगलात नेले. सोबत असलेल्या वनमजुरांनी वाघाला हुसकवण्याचा प्रयत्न केला. पण, तोपर्यंत स्वाती यांना वाघानं ठार केलं होतं.