धक्कादायक: पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलात वेटरची फेसबुक लाइव्ह करत आत्महत्या!

पुणे: पुण्यातील मुंढवा परिसरातील एका प्रसिद्ध हॉटेलच्या तेराव्या मजल्यावरून वेटर उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित कामगाराने फेसबुकवर लाइव्ह करत हॉटेलमधील काही लोकांनी त्याला फसवल्याचा आरोप केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंदसिंह राठोड हा मूळचा उत्तराखंडचा राहणारा असून महिन्याभरापूर्वीच मुंढवा येथील हॉटेल पेंट हाऊसमध्ये कामाला आला होता. मात्र महिनाभराच्या कालावधीत त्याला खूप त्रास सहन करावा लागला.त्यातून बुधवारी रात्रीच्या सुमारास अरविंदसिंह राठोड हा हॉटेलच्या टेरेसवर 13 व्या मजल्यावर गेल्यावर फेसबुक लाइव्ह केले.

मी आत्महत्या करणार असून हॉटेलमधील काही व्यक्तीनी वाईट केले असून फसवून काही काम करुन घेतले आहे. असे म्हणत असल्याचे दिसताच, त्याला अनेकांनी फोन केले.त्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने काही क्षणातच खाली उडी घेतली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून अधिक तपास करण्यात येत असल्याचे मुंढवा पोलिसांनी सांगितले.