काँग्रेसकडून विधान परिषदेच्या ‘या’ दोन जागांसाठी उमेदवार जाहीर

मुंबई: विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसनं दोन नावांची घोषणा केलीय. कोल्हापुरातून सतेज पाटलांना उमेदवारी देण्यात आलीय. तर धुळे-नंदुरबारमधून गौरव वाणी यांना संधी मिळालीय. विशेष म्हणजे या दोन जागांवर भाजपनं आधीच उमेदवार दिलेत. कोल्हापुरातून सतेज पाटलांच्या विरोधात भाजपनं अमल महाडिकांना रिंगणात उतरवलंय, तर धुळे-नंदुरबारमधून गौरव वाणींच्या विरोधात अमरिश पटेल मैदानात आहेत.

2014 मध्ये कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात अमल महाडिक विरुद्ध सतेज पाटील अशी लढत झाली होती. अमल महाडिक यांनी त्यावेळी सतेज पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर सतेज पाटील कोल्हापूर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले होते. आता पुन्हा त्यांच्यासमोर अमल महाडिकांचं आव्हान आहे.

विधानसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून डावलले गेलेले माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना अखेर संधी मिळाली आहे. दरम्यानच्या काळात बावनकुळे नाराज असल्याच्या चर्चा होत्या, मात्र ते सातत्याने पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात सक्रीय राहिले. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, वाढीव वीज बिल विरोधी आंदोलन यासारख्या अनेक आंदोलनांचं बावनकुळेंनी नेतृत्व केलं. त्यानंतर आता नागपूर विधान परिषदेसाठी पक्षाकडून बावनकुळे यांना तिकीट देण्यात आले आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेले 6 सदस्य कदम रामदास गंगाराम (मुंबई मतदारसंघ), अशोक अर्जुनराव उर्फ भाई जगताप (मुंबई), पाटील सतेज उर्फ बंटी (कोल्हापूर), अमरीशभाई रसिकलाल पटेल (धुळे तथा नंदूरबार), गोपीकिसन राधाकिसन बाजोरिया (अकोला तथा बुलढाणा तथा वाशिम) आणि व्यास गिरीषचंद्र बच्छराज (नागपूर मतदारसंघ) यांची  1 जानेवारी 2022 रोजी मुदत समाप्त होत आहे.