आर्यन खान प्रकरण; किरण गोसावीला भोसरी पोलिसांनी केली अटक
भोसरी: आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील वादग्रस्त पंच किरण गोसावीला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. गोसावीच्या विरोधात काही दिवसांपूर्वी नोकरीच्या निमित्ताने फसवणूक केल्याची तक्रार दाखल झाली होती. विजय कुमार सिद्धलिंग कानडे या 33 वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली होती.
गोसावीने विजय कुमार सिद्धलिंग कानडे याला 2015 ला ब्रुनेई इथं हॉटेल मॅनेजमेंटमध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने 2 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केली होती. फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी किरण गोसावीला अटक केली होती. त्यानंतर आता भोसरी पोलिसांनी त्याला अटक करत 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
किरण गोसावीवर नोकरीचे आमिष दाखवत आर्थिक फसवणूक केल्याचे पुण्यात चार , पिंपरी चिंचवडमध्ये एक गुन्हा दाखल झाला आहे. राज्याच्या इतर भागातून पाच गुन्हे दाखल झाले आहेत. पुण्यातील फरासखाना पोलीस स्थानकात तीन वर्षांपूर्वी गोसावीवर फसवणुकीचा पहिला गुन्हा नोंद झाला होता. ज्या ज्या नागरिकांची किरण गोसावीने फसवणूक केली आहे त्यांनी न घाबरता पुढं येऊन तक्रारी दाखल करव्यात असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.