माजी क्रिकेटर आणि भाजप खासदार गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी; सुरक्षेत वाढ

मुंबई: भारताचा पूर्व क्रिकेटर आणि भाजप खासदार गौतम गंभीर आणि कुटुबीयांना ”ISIS काश्मीर” या दहशतवादी संघटनेनं जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यानंतर गौतम गंभीर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच गंभीर यांच्या घराच्या सुरक्षेचाही आढावा घेण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय.

गौतम गंभीर हे सध्या पूर्व दिल्लीचे भाजप खासदार आहेत. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते आणि निवृत्त क्रिकेटर नवज्योत सिद्धू यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना भाऊ म्हटल्यानंतर गौतम गंभीर यांनी जोरदार हल्लाबोल चढवला होता. सिद्ध यांच्या या वक्तव्याचा एक व्हिडिओही काही दिवसांपूर्वी वायरल झाला होता. त्यात ते इम्रान खान यांचं स्वागत करताना आणि इम्रान यांना “बडाभाई” म्हणताना दिसून आले होते.

सिद्धू यांच्या या वक्तव्यानंतर सिद्ध यांनी आपल्या मुलांना सीमेवर पाठवावे असे वक्तव्य गंभीर यांनी केले होते. सिद्ध यांची मुलं सीमेवर असती तर त्यांनी असं वक्तव्य कले असते का? असा सवाल गंभीर यांनी उपस्थित केला होता. एका महिन्यात काश्मीरमध्ये 40 नागरिक आणि सैनिकांचा मृत्यू झाला त्यावर सिद्धू बोलायला तयार नाहीत. देशाची सुरक्षा करतात त्यांच्या समर्थनाला तयार नाहीत.  त्यामुळे सिद्धू यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत लाजीरवाणे असल्याचं गौतम गंभीर यांनी म्हटलं होतं. कॅप्टन अमरिंदर सिंह आणि सिद्धू यांच्या वादावरूनही गंभीर यांनी जोरदार हल्लाबोल चढवला होता. त्यानंतर आता गंभीर यांना आलेल्या धमकीनंतर खळबळ उडाली आहे. गंभीर यांच्या घराच्या सुरक्षेचाही पोलिसांकडून आढावा घेण्यात आलाय.