राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुलक्षणा शिलवंत-धर यांचे नगरसेवक पद रद्द, ‘हे आहे कारण’

पिंपरी: करोना साथीच्या आजारामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेला थेट पद्धतीने मास्कचा पुरवठा करणार्‍या मे. एडिसन लाईफ सायन्स प्रा. लि. या कंपनीशी संबंध सिद्ध झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांचे पद रद्द करण्यात आले आहे. हा शिलवंत यांच्यासह राष्ट्रवादीला झटका मानला जात आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी (दि. 24) हे आदेश जारी केले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने करोना साथीच्या पहिल्या टप्प्यामध्ये शहरातील झोपडपट्टीमधील नागरिकांना वाटप करण्यासाठी दहा लाख रुपयांच्या मास्कची थेट खरेदी केली होती. यापैकी मे. एडिसन लाईफ सायन्स प्रा. लि. या कंपनीने 1 लाख मास्कचा प्रतिनग दहा रुपये या प्रमाणे पुरवठा केला होता. त्यापोटी दहा लाख रुपये पालिकेने या कंपनीला अदा केले होते. लोकप्रतिनिधी संबंधित असलेल्या कोणत्याही कंपनीला अथवा संस्थेला आर्थिक फायद्यासाठी निविदा प्रक्रियेत सहभाग नोंदविता येत नाही.

मात्र, एडिसन लाईफ सायन्सेस या कंपनीमध्ये सुलक्षणा शिलवंत यांचे पती राजू धर व त्यांचे बंधू राजरत्न शिलवंत हे संचालक असल्यामुळे माजी नगरसेवक व शिवसेनेचे पदाधिकारी जितेंद्र ननावरे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेसंदर्भात न्यायालयाने विभागीय आयुक्तांना सहा आठवड्यात निर्णय घेण्यासंदर्भात आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी काल अंतिम निकाल जाहीर केला आहे.

सौरभ राव यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, उपरोक्त कंपनीस दिर्घ मुदतीचे कर्ज हे सुलक्षणा शिलवंत यांनी दिलेले दिसून येत आहे. सदर कर्ज अस्तित्त्वात नसलेबाबत कोणताही पुरावा त्यांच्याकडून सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांचा कंपनीशी संबंध असल्याचे निदर्शनास येते. तसेच कंपनीशी संबंध असल्यामुळे मास्क खरेदी प्रक्रियेतीलही त्यांचा संबंध निदर्शनास येत आहे.

सत्यमेव जयते – जितेंद्र ननावरे

सत्याचा विजय होतो ते या निकालाने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कोविड काळात आपल्या पदाचा गैरवापर करून सुलक्षणा शिलवंत यांनी आपल्या भावाच्या व पतीच्या नावे असलेल्या कंपनीच्या माध्यमातून महापालिकेला मास्कचा पुरवठा केला होता. कागदोपत्री असलेले पुरावे तपासून विभागीय आयुक्तांनी हा निर्णय दिला असून मी या निर्णयाचे स्वागत करतो. विभागीय आयुक्त आणि न्यायालयाचा मी आभारी आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!