पायी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत गाडी शिरल्याने भीषण अपघात; 2 ठार तर 30 जण जखमी

पुणे: कार्तिकी एकादशीला आळंदीकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये पिक अप गाडी घुसल्याने भीषण अपघात झाला आहे. हा अपघात कामशेत जवळील कान्हे फाटा येथे झाला आहे. या अपघातामध्ये दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर 30 वारकरी जखमी झाले आहेत. जखमी वारकऱ्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वारकऱ्यांची दिंडी कार्तिकी एकादशीनिमित्त आळंदीकडे निघाली होती. खालापूर येथूल सकाळी ही दिंडी आळंदीकडे निघाली होती. रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या वारकऱ्यांच्या या दिंडीमध्ये भरधाव वेगाने जाणारी पिक अप गाडी घुसली. पिक अप गाडीने काही वारकऱ्यांना चिरडले. या अपघातामध्ये दोन वारकरी गंभीर जखमी झाले त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर इतर 30 जखमी वारकऱ्यांवर उपचार सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी यासंदर्भात ट्वीट करत माहिती दिली. तसंच आम्ही शक्य ते प्रयत्न करत असल्याचे सांगितले.
आळंदीकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीला कामशेत(साते)गावाजवळ वाहनाची जोरदार धडक बसून,या दुःखद घटनेत १८ वारकऱ्यांना गंभीर इजा झाली आहेत. जखमी वारकऱ्यांची प्रकृती लवकर बरी होवो ही प्रार्थना.आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करू. नजीकच्या रुग्णालयात त्वरित उपचार सुरू करण्यात आले आहेत
— Parth Pawar (@parthajitpawar) November 27, 2021
या अपघातामध्ये सविता वाळफू येरभ (58 वर्षे) आणि जयश्री आत्माराम पवार (54 वर्षे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सविता या खालापूर येथील उंबरे गावच्या रहिवासी होत्या. तर जयश्री कर्जत तालुक्यातील भूतवली गावच्या रहिवासी होत्या. या घटनेची माहिती मिळताच वडगाव-मावळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पिक अप चालकाला पोलिसांनी ताब्यात घतले आहे. या अपघाताचा तपास सुरु आहे.