‘’ज्यांच्या बुद्धीला जे वाटलं ते बोलले, महाविकास आघाडी सरकार….’’; अजित पवारांचा राणेंना टोला

पुणे: केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी राज्यातील आघाडी सरकार मार्चमध्ये कोसळणार असल्याचा दावा केला आहे. राणेंच्या या दाव्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हवाच काढून घेतली आहे. त्यांच्या बुद्धीला जे वाटलं ते ते बोलले. आमचं सरकार चालणार आहे हे आमच्या अनेक नेत्यांनी स्पष्ट केलंच आहे, असा टोला अजित पवार यांनी लगावला.

अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना नारायण राणे यांच्या दाव्याविषयी विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी हा दावा केला. ज्या दिवसापासून सरकार आलंय तेव्हापासून सरकार पडणार असल्याचं ऐकत आहे. पण सरकार चाललंय ना बाबा. कोण काय बोलतंय हे तुम्ही कोट करून सांगता. पण त्यांच्या सदसदविवेकबुद्धीला जे योग्य वाटतं ते ते बोलत आहेत. आमच्यातील अनेक मान्यवरांनी सरकार चाललं आहे. सरकारला काहीही धोका नाही हे आधीच स्पष्ट केलं आहे, असं पवार यांनी सांगितलं.

यावेळी त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. दोन ठिकाणी निवडणुका होत आहेत. त्याला आम्हीच जबाबदार आहोत का? सरकारच दुधखुळं आणि विरोधक काहीच करत नाही असं काही आहे का? टाळी एका हाताने वाजते का महाराज? दोन हात लागतात ना? बिनविरोध निवडणूक लढवण्याबाबत पहिलं स्टेटमेंट कुणी काढलं? विरोधकांनी काढलं. काही केलं तरी मुंबईत दोनच उमेदवार निवडून येणार होते. तिसरा फॉर्म आला.

त्या उमेदवाराला लढण्यात काही अर्थ नसल्याचं वाटलं. त्याने माघार घेतली. कोल्हापुरात कितीही गप्पा मारल्या, कितीही आवाज काढले तरी सतेज पाटीलच निवडून येणार होते. राष्ट्रवादीचे सर्वाधिक मते होती. काँग्रेसची त्याखालोखाल मते होती. तर धुळे-नंदूरबारमध्ये अमरीश पटेल कुठेही गेले तरी ते विजयी होतात. ते भाजपमध्ये गेले. त्यांच्याकडे संख्याबळ अधिक होते. त्यामुळे त्या ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली. अशा 6 पैकी 4 जागा बिनविरोध झाल्या. नागपूरमध्ये परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे तिथे निवडणूक होत आहे, असं त्यांनी सांगितलं.