मुख्यमंत्रीसाहेब, परदेशातून येणाऱ्यांना विमानतळावरच क्वारंटाईन करा; पिंपरी-चिंचवडच्या महापौर माई ढोरेंची मागणी
पिंपरी: कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी परदेशातून पिंपरी-चिंचवडमध्ये येऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना विमानतळाच्या आसपासच १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात यावे, अशी मागणी महापौर माई ढोरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. तसेच पिंपरी-चिंचवडकरांनीही घाबरून न जाता कोरोनाचे नियमांचे काटेकोर पालन करून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
नायजेरिया या देशातून पिंपरी-चिंचवडमध्ये आलेले ३ आणि त्यांच्या संपर्कात आल्याने त्यांच्याच कुटुंबातील ३ अशा एकूण ६ जणांना कोरोनाच्या ओमायक्रॉनाचा संसर्ग झाला आहे. या पार्श्वभूमीवर महापौर माई ढोरे यांनी पिंपरी-चिंचवडकरांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. स्वतःचीही काळजी घ्या आणि इतरांना संसर्ग होईल असे न वागण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
महापौर माई ढोरे म्हणाल्या, “कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट आपणा सर्वांना भोगावी लागली. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. आता कोरोनाचा ओमायक्रॉन हा नवीन विषाणू समोर आला आहे. त्याचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन खबरदारी घेत आहे. काही उपाययोजनाही सुरू करण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडून वेळोवेळी केल्या जाणाऱ्या सूचना आणि नियमांचे पालन करून पिंपरी-चिंचवडकरांनी सहकार्य करावे. शहरात ओमायक्रॉनचे ६ रुग्ण सापडले असल्याने पिंपरी-चिंचवडकरांनी घाबरून जाऊ नये. प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी.
कोरोनाचा विषाणू परदेशातून आला आहे. त्यामुळे परदेशातून पिंपरी-चिंचवडमध्ये येणाऱ्यांना विमानतळावरच क्वारंटाईन करण्याची आवश्यकता आहे. त्यानुसार १४ दिवस क्वारंटाईन करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. जेणेकरून ओमायक्रॉनचा प्रसार रोखता येईल. त्याबाबत राज्य सरकारने गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.”