हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू

मुंबई: भारतीय लष्कराची दीर्घकाळ सेवा करणारे माजी लष्करप्रमुख आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. या दुर्घटनेत त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला आहे. तामिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं. या हेलिकॉप्टरमधून बिपीन रावत हे पत्नीसह प्रवास करत होते. यावेळी दोघांचाही मृत्यू झाला. त्यांच्यासह या दुर्घटनेत एकूण 14 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

तामिळनाडूच्या कुन्नूर येथील जंगलात ही दुर्घटना घडली. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जातं. हेलिकॉप्टर दुर्घटनेतील जखमींना जवळच्या वेलिंग्टन बेसमध्ये नेण्यात आलं असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संरक्षण खात्याने या दुर्घटनेची सर्व माहिती घेतली असून या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. भारतीय हवाई दलाने एक ट्विट करून बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं.

बिपीन रावत हे पत्नीसह वेलिंग्टन येथील एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जात होते. वेलिंग्टनमध्ये आर्म्ड फोर्सचं महाविद्यालय आहे. या ठिकाणी रावत यांचं लेक्चर होतं. तिथून ते कुन्नूरकडे निघाले होते. त्यांना तिथून दिल्लीला जायचं होतं. मात्र, घनदाट जंगलात ही दुर्घटना घडली.

कुन्नूरच्या घनदाट जंगलात चारही बाजूने झाडच झाडं आहेत. हा अपघात अत्यंत भीषण होता. अपघात होताच जंगलात आग लागली. या दुर्घटनेची माहिती मिळतात हवाई दल आणि लष्कराची पथकं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. हे हेलिकॉप्टर एमआय-सीरिजचं असल्याचं सांगितलं जातं. MI-17, V-5 या सीरिजचं हे हेलिकॉप्टर होतं. बिपीन रावत यांच्यासोबत काही अधिकारी आणि कर्मचारीही होतं.

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!