श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, पोलिसांच्या वाहनावर अंदाधुंद गोळीबार, दोन जवान शहीद, 12 जखमी

4

मुंबई: जम्मू काश्रमीमधल्या श्रीनगर येथील जेवन भागात सोमवारी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या घटनेत बसवर मोठ्या प्रमाणावर गोळीबार करण्यात आला. या घटनेत 2 जवान शहीद झाले तर 12 जवान जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृतीही नाजूक आहे असंही सांगण्यात आलं आहे. जम्मू काश्मीर 9 बटालियन सशस्त्र जवानांवर दहशतवाद्यांनी हा हल्ला केला.

जखमी झालेल्या सर्व जवानांना आर्मी रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. आज तकने दिलेल्या बातमीनुसार बाईकवर बसून आलेल्या दहशतवाद्यांनी हा भ्याड हल्ला केला आहे. जम्मू काश्मीर पोलिसांची ही बस बुलेट प्रुफ नव्हती. त्यामुळेच या हल्ल्यात दोन जण शहीद झाले आहेत तर 12 जण जखमी झाले आहेत. ज्या ठिकाणी हल्ला झाला तो परिसर सील करण्यात आला आहे. या ठिकाणी वावरणाऱ्यांची कसून तपासणी केली जाते आहे.

आजच श्रीनगरच्या रंगरेथ भागात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आलं आहे. सुरक्षा दलांना ही सूचना मिळाली होती श्रीनगरच्या रंगरेथ भागात दहशतवादी आले आहेत. त्यानंतर शोध मोहीम चालवण्यात आली. आपण जवानांच्या वेढ्यात अडकल्याचं लक्षात येताच या दहशतावाद्यांनी गोळीबार केला. सुरक्षा दलांनी उत्तरादाखल केलेल्या फायरिंगमध्ये दोन दहशतवादी मारले गेले.

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे. रविवारी पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा या ठिकाणी सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. त्यामध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आलं. मारला गेलेला दहशतवादी हा जैश ए मोहम्मदमध्ये सक्रिय होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.