पुण्यातील 1 ली ते 7 वीचे वर्ग 16 डिसेंबरपासून सुरू होणार ; महापौर मुरलीधर मोहळ यांची माहिती

पुणे: पुण्यातील 1 ली ते 7 वीचे वर्ग येत्या गुरुवारपासून म्हणजेच 16 डिसेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरियंटमुळे राज्यातील शाळांना सुरू करण्याबाबत राज्य सरकारने यावेळी सावध पावलं टाकण्याचा निर्णय घेतला आणि स्थानिक प्रशासनाला निर्णय घेण्याची परवानगी दिली.

शाळा सुरु करण्यासंदर्भात पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, महापौर मुरलीधर मोहोळ आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार, विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या बैठक झाली. या बैठकीत पुण्यातील शाळा 16 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

सरकारने राज्यभरातील प्राथमिक शाळा 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.परंतु कोरोना व्हायरसचा नवा ओमिक्रॉनचा व्हेरिएंट आल्यामुळे मुंबई, पुणे येथील शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला होता. 15 डिसेंबरपर्यंत मुंबई आणि पुण्यामधील शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पालिकेने दिली होती, परंतु आता पुण्यातील शाळा 16 डिसेंबरपासून सुरु होणार आहेत.