रुपाली पाटील यांचा मनसेला अखेर ‘जय महाराष्ट्र’! अजित पवारांच्या उपस्थितीत हाती घड्याळ बांधणार

29

राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यापूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला  पुण्यात मोठा धक्का बसला आहे. कारण मनसे नेत्या रुपाली पाटील यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ केलाय. पाटील यांनी पक्षातील सर्व पदांचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. मनसे नेते अनिल शिदोरे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा दिल्याचं कळतंय. त्यांच्याकडे मनसेच्या महिला प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी होती.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर्गत वादामुळे त्या नाराज आणि पक्षाला रामराम ठोकतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. रुपाली पाटील या मनसेच्या डॅशिंग नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. मात्र त्यांनी पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यानं मनसेला हा मोठा धक्का मानला जात आहे. महत्वाची बाब म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यापूर्वीच पाटील यांनी राजीनामा दिला आहे.

दरम्यान, मनसेच्या सर्व पदांचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर रुपाली पाटील या आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याशी त्यांची चर्चा झाली आहे. जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या शुक्रवारी रुपाली पाटील या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र त्याबाबत अद्याप खात्रीलायक माहिती मिळालेली नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.