इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, या तारखेपासून परीक्षा?

मुंबई: राज्यात दहावी, आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 10वीची परीक्षा 15 मार्चे ते 18 एप्रिल दरम्यान होणार आहे, तर बारावीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थी अनेक परीक्षांना मुकले होते. ओमिक्रॉनचा नवा व्हेरिएंट आल्यानंतर यंदातरी परीक्षा होणार का? असा सवाल अनेक विद्यार्थ्यांना पडला होता. परंतु आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी वेळापत्रक जाहीर केले.

राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच घेतल्या जाणार आहेत अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. इयत्ता बारावीची बोर्डाची लेखी परीक्षा ही 4 मार्च 2022 ते 7 एप्रिल 2022 या दरम्यान होणार आहे. तर दहावी बोर्डाची परीक्षा ही 15 मार्च 2022 ते 18 एप्रिल 2022 या दरम्यान घेण्यात येणार आहे. दरम्यान या सर्व परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहेत.

दहावी आणि बारावीच्या तोंडी परीक्षा कधी होणार आहेत याबद्दलही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. इयत्ता बारावीच्या तोंडी परीक्षा 14 फेब्रुवारी 2022 ते 3 मार्च 2022 दरम्यान होणार आहे. तर इयत्ता दहावीच्या तोंडी परीक्षा 25 फेब्रुवारी 2022 ते 14 मार्च 2022 दरम्यान घेण्यात येणार आहेत.