मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धा पुढे ढकलली, भारताच्या मानसा वाराणसीसह 17 जणांना कोरोनाची लागण

मुंबई: ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. त्यातच आता कोरोनाचा शिरकाव मिस वर्ल्ड स्पर्धेतही झाला आहे. मिस वर्ल्ड 2021 मधील स्पर्धक आणि भारतीय मॉडेल मानसा वाराणसी हिला कोरोना संसर्ग झाल्याची धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली आहे. तिच्याशिवाय आणखी 17 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. अशा परिस्थितीत सुरक्षेचा विचार करून मिस वर्ल्ड 2021 स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे.

गुरुवारी हा इव्हेंट सुरू होण्याच्या काही तास आधी याबाबतची घोषणा करण्यात आली. मिस वर्ल्ड 2021 ही स्पर्धा दक्षिण अमेरिकेत सुरु आहे. त्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या स्पर्धकांना द. अमेरिकेच्या Puerto Rico मध्ये आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. इथेच या स्पर्धेचा फिनालेही होणार होता.

मात्र, आता ग्रँड फिनालेचा संपूर्ण कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून त्याचं नवं वेळापत्रक तयार केलं जाईल. ही स्पर्धा पुढील 90 दिवसात पुन्हा आयोजित केली जाईलं असं मिस वर्ल्ड स्पर्धा आयोजित करणाऱ्या संघटनेने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ‘स्पर्धकांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात घेऊन मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनने मिस वर्ल्ड फिनाले पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.’

17 स्पर्धक आणि कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. कोरोनाने संक्रमित झालेल्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारी मानसा वाराणसी हिचा देखील समावेश आहे. मानसाने या स्पर्धेत सहभागी होण्याआधी मिस इंडिया वर्ल्ड 2020 चा हा किताब पटकावला होता.