टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात तुकाराम सुपेच्या चालकाला पुणे पोलिसांकडून अटक

पुणे: टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहेत. त्यानंतर आता अटकेत असलेल्या निलंबित महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त तुकाराम सुपे  याच्या ड्रायव्हरला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात तुकाराम सुपे यांचा ड्रायव्हर सुनील घोलप याच्यासह मनोज डोंगरे  याला अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात पुणे पोलिसांच्या हाती अधिक धागेदोरे लागण्याची शक्यता आहे. पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत. तुकाराम सुपे याने पाठवलेले विद्यार्थ्यांची नावे आणि हॉल तिकिट अन्य आरोपींना पाठवण्याचे काम सुनील घोलत करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले. सुनील घोलप याने 2020 मधील शिक्षक पात्रता परीक्षेत इतर आरोपींसोबत संगनमत करुन अपात्र झालेल्या विद्यार्थ्यांना पास केले. यासाठी त्याने कोट्यावधी रुपये घेतल्याची माहिती आहे.

अटक करण्यात आलेला तुकाराम सुपे हा त्याचा ड्रायव्हर सुनील घोलप याच्या व्हॉट्सअ‍ॅपवर विद्यार्थ्यांची नावे त्यांची हॉल तिकीट पाठवत असल्याचे उघड झाले आहे. पुणे पोलिसांनी अटक केलेल्या सुनील घोलप याच्याकडून तुकाराम सुपे याचे आणखी काही कारनामे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.