ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचे निधन, 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचे निधन झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मुंबईतील माहिम  येथील निवासस्थांनी त्यांचे निधन झाले आहे. रेखा कामत यांनी चित्रपट, नाटक, मालिका आणि जाहिरात या अभिनयाच्या चारही क्षेत्रात काम केले आहे. त्यांच्या जाण्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीवर दु:खाचा डोंगर पसरला आहे.

1952 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लाखाची गोष्ट’ या मराठी चित्रपटातून रेखा कामत यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. राजा परांजपे, ग. दि माडगूळकर आणि सुधीर फडके यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. रेखा यांनी ‘कुबेराचे धन’, ‘गृहदेवता’, ‘गंगेत घोडे न्हाले’, ‘मी तुळस तुझ्या अंगणी’, ‘माझी जमीन’ या गाजलेल्या चित्रपटात त्यांनी काम केले आहे. ‘नेताजी पालकर’ चित्रपटात रेखा कामत यांनी एक लावणी नृत्य केले. तर ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटात बैठकीची लावणीही सादर केली होती.

‘सौभद्र’, ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ‘संशयकल्लोळ’ या संगीत नाटकांत त्यांनी काम केले होते. तसंच ‘दिल्या घरी तू सुखी राहा’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘लग्नाची बेडी’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘प्रेमाच्या गावा जावे’, ‘गोष्ट जन्मांतरीची’, ‘दिवा जळू दे सारी रात’, ‘कालचक्र’ या व्यावसायिक नाटकांतून त्यांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी साकारल्या सर्व नाटकांची एकूण प्रयोगसंख्या पाच हजारांहून अधिक आहे.

रेखा कामत यांना नृत्याची प्रचंड आवड होती. रेखा आणि त्यांची बहीण चित्रा या दोघींनी शाळेत असतानाच नृत्याचे आणि गायनाचे प्रशिक्षण घेतले होते. ख्यातनाम नृत्यगुरू पार्वतीकुमार यांच्याकडून दोघी बहिणींनी शास्त्रीय नृत्याचे धडे गिरवले होते. नृत्यनाटिकेमुळे दोन्ही बहिणींना चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. या दोघी बहिणींमध्ये कुमुद सुखटणकर म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत या थोरल्या तर कुसुम सुखटणकर म्हणजे अभिनेत्री चित्रा नवाथे या धाकट्या होत्या. ‘लाखाची गोष्ट’ हा रेखा कामत यांच्या पहिल्या चित्रपटात त्यांची बहिण चित्रा यांनीसुद्धा काम केले होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!