पुण्यात बड्या बिल्डरला अजित पवारांच्या फोन नंबरचा वापर करत धमकी; ६ जण ताब्यात
पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल नंबरवरून पुण्यातील बड्या बांधकाम व्यावसायिकाला धमकीचा फोन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अजित पवार यांच्या मोबाईल नंबरवरून या बांधकाम व्यावसायिकाकडून २० लाखांची खंडणीची मागणी करण्यात आली. याप्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याप्रकरणी ६ जणांना गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने अटक केली असून १० दिवसांच्या पोलीस कस्टडीत पाठविण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पीए चौगुले बोलत असल्याचा फोन पुणे शहरातील बड्या बांधकाम व्यावसायिकाला करण्यात आला होता. एका अॅपद्वारे अजित पवार यांच्या मोबाईल नंबरचा गैरवापर करून व्यावसायिकाकडे २० लाख रुपयांची खंडणीची मागणी केली. यातील दोन लाख रुपये आरोपींने घेतले होते.
हा प्रकार मागील दहा दिवसांपासून १३ जानेवारीपर्यंत सुरू होता. अखेर व्यावसायिकाने पोलिसात धाव घेतली आणि बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आयपीसी ३८४, ३८६, ५०६, ३४ आयटी अॅक्ट कलम ६६ (सी), (डी)नुसार याप्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आता याप्रकरणी ६ जणांचा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच सर्व आरोपींना १० दिवसांसाठी पोलीस कस्टडीत पाठविण्यात आले आहे.
माहितीनुसार, आरोपींनी गुगल प्ले स्टोअरवरून फेक कॉल अॅप नावाचा अॅप डाऊनलोड केला. या अॅपच्या मदतीने अजित पवार यांच्या मोबाईल नंबरचा गैरवापर करून व्यावसायिकाला धमकीचा फोन केला. अजित पवार यांचे पीए चौगुले असल्याचे सांगून २० लाखांच्या खंडणीची मागणी केली. एवढेच नाहीत तर बाडेबोलाइ येथील बाबा चोरमले आणि इतर नऊ जणांच्या मालकीच्या जमिनीचा वाद मिटवून टाका असे फोनवरून व्यावसायिकाला सांगण्यात आले.