दिंडोरी नगरपंचायत: केंद्रीय मंत्री भारती पवार यांना मोठा धक्का

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील कळवण, देवळा, निफाड आणि दिंडोरी नगरपंचायतींसाठी मंगळवारी मतदान झाले होते. त्याचा निकाल आज जाहीर होत असून त्यात जिल्ह्यातील अतिशय चर्चित आणि प्रतिष्ठेच्या दिंडोरी नगरपंचायतीत केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांना आपल्याच मतदार संघात जोरदार धक्का बसला आहे. या ठिकाणी 17 पैकी 6 जागा मिळवून शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर भाजपला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस येथे एकत्र आले, तर सहजपणे महाविकास आघाडीची सत्ता येऊ शकते.
डॉ. भारती पवार या खासदार आहेत. दिंडोरी नगरपंचायतीची निवडणूक त्यामुळे डॉ. भारती पवार यांनी प्रतिष्ठेची केली होती. त्या मतदारसंघातही तळ ठोकून होत्या. येथे नगरपंचायतीच्या एकूण 17 जागा आहेत. त्यापैकी सहा जागा शिवसेनेने पटकावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने 5 जागा पटकावल्या आहेत, तर भाजपला चार आणि काँग्रेसला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी येथे शिवसेना आणि राष्ट्रवादीही एकत्र आले, तर नगरपंचायत त्यांच्या ताब्यात राहू शकते. विशेष म्हणजे मोदी लाटेत निवडून येणाऱ्या पवार यांना नगरपंचायत निवडणुकीत धक्का बसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
असे आहे आजचे चित्र
एकूण जागा – 17
शिवसेना – 6
राष्ट्रवादी – 5
भाजप – 4
काँग्रेस – 2
इतर(अपक्ष) – 00