फिल्मसिटीमध्ये चित्रीकरणपूर्व आणि चित्रीकरणानंतरच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबतचा आराखडा तयार करावा – अमित देशमुख

मुंबई: गोरेगाव येथील फिल्मसिटीमध्ये मराठीबरोबरच विविध भाषांतील सिनेमा, मालिका, जाहिरात, वेबसिरीज, माहितीपट यांचे चित्रीकरण सुरु असते. येणाऱ्या काळात फिल्मसिटीमध्ये चित्रीकरणपूर्व आणि चित्रीकरणानंतरच्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबतचा आराखडा फिल्मसिटीमार्फत तयार करण्यात यावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज दिले.

आज फिल्मसिटी येथे महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक कैलास पगारे, सहव्यवस्थापकीय संचालक कुमार खैरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

अमित देशमुख म्हणाले की, फिल्मसिटीमध्ये चित्रपट निर्मात्यांसाठी चित्रीकरणपूर्व आणि चित्रीकरणानंतरच्या प्रक्रियेकरिता एका ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी फिल्मसिटीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त स्टुडिओ निर्माण करणे आवश्यक आहे. फिल्मसिटीमध्ये हे सर्व एकाच ठिकाणी कसे करता येऊ शकेल याबाबत दोन कंपन्यांनी यावेळी सादरीकरण केले. या कंपनीने सादर केलेल्या सादरीकरणानंतर यातील बाबींचा विचार करुन फिल्मसिटीमध्ये सुसज्ज आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टुडिओ उभारण्याबाबतचा आराखडा तयार करण्यात यावा.